Sunday 18 September 2011

ज्युलिया गॉर्डन - मुलांसाठी झटणारी अमेरिकन शिक्षिका

ज्युलिया गॉर्डन - मुलांसाठी झटणारी अमेरिकन शिक्षिका
आपल्याकडील एकशिक्षकी शाळेप्रमाणेच अमेरिकेतही ग्रामीण भागात 1930 च्या दशकात एकशिक्षकी शाळा होत्या. अशीच स्टोनी ग्रोव्ह ही शाळा. या शाळेत चार वर्षं (1936-40) काम करणारी व शाळेचे रूप व मुलांचे व्यक्तिमत्त्व बदलून टाकणारी शिक्षिका ज्युलिया वेबर गॉर्डन.

शाळेला एकच खोली. तिला लागून स्वयंपाकघर. त्यात मोठमोठी भांडी. डिशवॉशर, काचेच्या प्लेटस्, चमचे इत्यादि. मोठं आवार. त्यापासून जवळच जंगल. शाळेत एक ते आठ इयत्ता मिळून 27 मुले. त्यापैकी 13 वर्षावरील आठ मुले, 10 ते 12 वयोगटातील आठ मुले व पाच ते नऊमधील नऊ मुले व दोन मुले पाचच्या आतील होती. या मुलांचे इयत्तावार गट न करता त्यांना चाचण्या देऊन त्यांच्या आकलन क्षमतेनुसार त्यांची तीन गटांत विभागणी केली. त्यामुळे प्रत्येक गटाला पुरेसा वेळ देणे शक्य झाले. ज्युलियाच्या दृष्टीने प्रत्येक मूल महत्त्वाचं होतं. अक्षरओळख असली तरी छापील शब्दाच्या जागी मुले बोलीभाषेतील शब्द घालून वाचीत. मुलांना एकमेकांशी वा गटात खेळण्याची सवय नव्हती. त्यासाठीही तिने प्रयत्न केले. रोज रात्री सर्व गटांचे दुसर्‍या दिवशीचे वेळापत्रक ती आखून ठेवत असे. दुसर्‍या दिवशी रात्री ते कसे पार पडले, यावर मागोवा चिंतन करत असे व त्यानुसार पुढच्या वेळापत्रकात बदल करीत असे.

मुलांशी अधिक परिचय व्हावा म्हणून जंगलची सहल केली. तेथील फुले, पाने, कंद-दहा प्रकारचे गोळा केले. मुलांनी बाग करण्यासाठी वाफे केले. त्यात कंद लावले. बाग फुलू लागली. पालकांच्या मदतीने बागेला कुंपण घातले. एकदा एका मुलाने आपला पांढरा छोटा उंदीर शाळेत आणला. ज्युलिया रागावली नाही. तिने मुलांना त्याचे वर्णन करण्यास सांगितले. नंतर त्याच्यावर गोष्ट रचली. अर्थात, हे सर्व चुटकीसरशी झाले नाही; पण तिने चिकाटी सोडली नाही. प्रश्न विचारून मुलांकडून ती गोष्ट लिहून घेतली.

कोणत्याही आखीव-रेखीव अभ्यासक्रमाचे बंधन ज्युलियावर नव्हते. तरीही तिने अनेक विषयांत मुलांमध्ये रस निर्माण केला. ती स्वत: हरहुन्नरी होती. समाजशास्त्राच्या उत्तरपत्रिकांचा उपयोग इंग्रजीतील व्याकरण शिकवण्यासाठी केला. शाळेच्या मैदानाचा आराखडा मुलांना कागदावर काढण्यास सांगितला. मैदानाच्या लांबी-रुंदीचे मोजमाप घेऊन खेळघर, बाग, खेळण्यासाठी मैदान इत्यादिंच्या जागा निश्चित केल्या. शाळेत चार ‘एच क्लब’चे महत्त्व सांगितले. (हेड, हँड, हार्ट व हेल्थ) शिवाय जंगल क्लब, गार्डन क्लब वगैरेमार्फत मुलांना कामे वाटून दिली. मुलांवर काही कामांची जबाबदारी सोपवली. मोठय़ा मुलांना इतिहासाची पुस्तकं दिली. नकाशे दिले व प्रश्नही दिले. मुलांना स्वत: पुस्तकं वाचून उत्तरे शोधायला लावली व नंतर ती मुलांच्या शब्दात लिहिण्यास सांगितले. या प्रक्रियेत वेळ जातो; पण त्यातून स्वयंअध्ययनाची सवय लागते. नाताळचा सण साजरा करण्यासाठी एका फ्रेंच दंतकथेवर आधारित नाटक ज्युलियाने लिहिलं. त्यातील प्रसंग मुलांनी सुचवले. प्रकाशयोजनाही विचार करून ठरवली. नाटकाची प्रॅक्टिस करून घेण्यात आयांनी आठवड्यातला दोन दिवसांचा वेळ दिला. सर्व पालक समारंभाला हजर राहिले व त्यांनी आनंद व्यक्त केला. पालकांच्या सहकार्यामुळे शाळा खर्‍या अर्थाने सामाजिक केंद्र बनले.

डायलेस्टाऊन येथील वस्तुसंग्रहाला भेट देण्यापूर्वी ज्युलिया व तिची मार्गदर्शक मैत्रीण एव्हरेट यांनी तेथे भेट दिली. तेथील पुस्तकांचे व अन्य साहित्यांचे अवलोकन केले. मुलांना तेथे काय पाहिले त्याची नोंद करण्यास सांगितले. प्राचीन काळातील पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू पाहून मुले आश्चर्यचकित झाली. दुसर्‍या दिवशी शाळेत त्यावर चर्चा केली. राल्फ व त्याच्या वडिलांनी शाळेपासून डायलेस्टोनपर्यंतचा नकाशावरचा मार्ग शोधून काढला. राल्फने तो शाळेत आणला. अशाच वस्तू मुलांनी कोणाच्या घरी आहेत ते सांगितले. त्यातूनच छोटेसे म्युझियम बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. दुग्धव्यवसाय, लोकसंख्या, वाहतुकीची साधने एक ना दोन विविध विषयांवर ज्युलिया माहिती गोळा करून ती मुलांपुढे ठेवत असे. शाळेतील चार वर्षांच्या वास्तव्यात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला ज्युलियाने हातभार लावला. तिच्या शाळेतून बाहेर पडलेली काही मुले पुढील शिक्षणासाठी शहरात गेली. काहींनी पशुपालन व शेतीशिक्षण घेतले. काही वर्षांनी ती शाळा बंद करण्याबाबत विचार चालू असता, पालकांनी ज्युलिया रॉबर्ट गॉर्डनसारखी शिक्षिका पुन्हा मिळेल या आशेने शाळा बंद करण्यास नकार दिला.

सध्या एकशिक्षकी शाळा अमेरिकेत नाहीत. पण शिक्षणाचा पाया कसा घातला गेला याची ही गोष्ट.



(संदर्भ- माय कण्ट्री स्कूल डायरी-ज्युलिया रॉबर्ट गॉर्डन. मराठी अनुवाद- विद्या भागवत, मनोविकास प्रकाशन)

No comments:

Post a Comment