Saturday 1 December 2012

गणिती कोडी, शब्दांची बाग आणि बरेच काही!

जालना-औरंगाबाद महामार्गावर वसलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचा उल्लेख प्रत्येक विद्यार्थी-शिक्षक 'माझी शाळा' म्हणून अभिमानाने करतात. कधीकाळी या शाळेत पिण्याच्या पाण्याचीही वानवा होती, पण या आणि यांसारख्या असंख्य प्रश्नांवर मात करून ही शाळा आता या भागातील आदर्श शाळा म्हणून दिमाखाने उभी आहे.
पुरेसे पाणी नसतानाही शाळेने आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन शाळेच्या परिसरातील १५ गुलमोहराची झाडे जगविली. आता शाळेत खणण्यात आलेल्या बोअरवेलमुळे झाडांना हक्काचे पाणी तर मिळतेच; त्याशिवाय एक सुंदर बागही शाळेच्या परिसरात फुलू लागली आहे.
टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रयोगही शाळा राबविते. शाळेकडे शिलाई मशीन आहे. या मशीनच्या मदतीने सातवीच्या मुलींनी जुन्या कपडय़ांपासून कापडी पिशव्या शिवून गावात वाटल्या. रद्दी पेपर आणि पुस्तकातून सहावीच्या मुलांनी अनोखे 'तरंग वाचनालय' तयार केले आहे. चॉकलेटच्या कागदांपासून हार, रिकाम्या दूध पिशवीपासून गजरे आणि वेण्या तयार केल्या आहेत. सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या वापरलेल्या ग्लासांपासून तयार केलेले झुंबर आणि तोरणे तर चांगलीच आकर्षक झाली आहेत.
प्रत्येक वर्गामध्ये मंत्रिमंडळे स्थापन केली आहेत. विद्यार्थ्यांच्या या मंत्रिमंडळाद्वारे वर्गाचे व्यवस्थापन केले जाते. प्रत्येकाचा वाढदिवस लक्षात राहावा म्हणून कोलाज चित्रे बनविण्यात आली आहेत. घोटीव कागदाच्या चटया, बांगडीच्या काचेपासून साखळी, वॉलपीस तयार केले आहेत. शाळेत लहान पोस्ट बॉक्स आहे. प्रत्येक विद्यार्थी सणावाराच्या प्रसंगी एकमेकांच्या नावे छोटे संदेश लिहून शुभेच्छा व्यक्त करतात. त्यासाठी प्रत्येक वर्गात एक-एक पोस्टमन नेमला आहे. तो स्वत:च्या वर्गाचे संदेश मुलांना वाटण्याचे काम करतो. आता तर अभ्यास अपूर्ण असल्यास व चूक झाल्यास, गैरहजर राहिल्यास विद्यार्थी शिक्षकांनाही 'मला माफ करा' असा संदेश पाठवू लागले आहेत.
परिपाठास मुलांनी वेळेवर हजर राहावे म्हणून परिपाठ संपवून आम्ही मैदानातच विविध गुणदर्शन उपक्रम राबवितो. यात विद्यार्थी समोर येऊन उत्स्फूर्तपणे कला सादर करतात. यात गाणी, गोष्टी, विनोद, नकला, पोवाडे, मुकाभिनय आदी प्रकार पाहायला मिळतात. ते पाहण्यासाठी व त्यात भाग घेण्यासाठी अलीकडे मुले मोठय़ा संख्येने परिपाठास हजर राहू लागले आहेत. या वेळी जी मुले शाळेत नीटनेटकी किंवा स्वच्छ दिसून येतात त्यांचे सर्वासमोर कौतुक केले जाते. ज्या वर्गाची उपस्थिती १०० टक्के असेल त्या वर्गाचे अभिनंदन करून त्यांना 'उपस्थिती ध्वज' दिला जातो. याचा उपस्थिती वाढविण्यासाठी उपयोग होतो.
मराठीचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी शब्दकोडी, गणितासाठी गणिती कोडीचे प्रयोग सध्या शिक्षक करीत आहेत. गणिताच्या शिक्षकांनी एक मोठ्ठाली सापशिडी तयार केली आहे. त्याचा वापर करून गणिती क्रिया सोडविणे सोपे झाले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञानाच्या शिक्षकांनी आधुनिक शेतीची प्रतिकृती तयार केली आहे. बाभूळ वनस्पतीच्या काटेरी काडय़ांना कागदी फुले लावून फ्लॉवरपॉट तयार केला आहे. इतिहासाच्या शिक्षकांनी मुलांच्या मदतीने किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे. वर्गाच्या कोपऱ्यात मातीपासून भुरूपे तयार केली आहेत. हिंदीतून बोलण्याचा सराव व्हावा यासाठी 'वन मिनिट शो' केला जातो.
पहिलीच्या मुलांना मुळाक्षरांची ओळख व्हावी यासाठी कार्डशीटपासून मुलांच्या नावाचे आद्याक्षर असणारे बिल्ले तयार केले असून ते विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर लावले जातात. उदा. ज्ञानेश्वर नाव असल्यास 'ज्ञ' असा बिल्ला तयार करून शर्टवर पिनने लावायचा. मुले एकमेकांचे बिल्ले पाहतात, चर्चा करतात. यातून मुळाक्षरे त्यांच्या लक्षात राहायला मदत झाली. दुसरीच्या शिक्षकांनी इंग्रजी कवितांवर आधारित 'जम्पअप' चित्रे, कोलाज चित्रे तयार केली आहेत, तर तिसरीच्या शिक्षकांनी शाळेत लवकरच प्रत्यक्षात येणारी 'शब्दांची बाग' फुलविण्यासाठी दोन हजार सोप्या इंग्रजी शब्दांचा संग्रह तयार केला आहे. याशिवाय सर्व वर्गासाठी भाषा विषयाची एक 'वर्ड बँक'पण आहे. प्रत्येक वर्गात भित्तिपत्रके आहेत. विद्यार्थी आपापले सुविचार, चिंतन, लेख, चारोळ्या, विनोद आदी साहित्य त्यावर प्रकाशित करतात.

No comments:

Post a Comment