Friday 2 November 2012

अपराधी पालक आणि शिक्षकांना शिक्षा!

आपण शाळेचे मालक आहोत, अशा थाटात शिक्षकांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या समस्त पालकांनी एकदा आपलंही बालपण आठवावं. एवढा मार खाऊन आपलं काही वाईट झालं नाही, उलट चांगलंच झालं, असं त्यांच्या लक्षात येईल..  शिक्षकांवर अविश्वास आहे, तो वाढतो आहे आणि कमी व्हायला हवा, हे लक्षात येत असूनही आपण असे वागतो आहोत..


शाळेत असताना आमच्या एका शिक्षकांनी आमच्याच वर्गात असलेल्या त्यांच्या मुलाला बेदम मारलं होतं. आजही तो मार अगदी काल घडल्यासारखा आठवतो. आपला मुलगा म्हणून त्याच्याकडे वात्सल्यानं पाहणं तर दूरच; पण त्याच्या चुकीबद्दल त्याच्या मित्रांसमोर चोपणं म्हणजे जरा जास्तच होतं, पण त्यामुळे त्या मुलाची कुणी टिंगल केली नाही, की त्या शिक्षकांबद्दल मनात आकस धरला नाही. तेव्हा शाळेतल्या शिक्षकांनी का मारलं, अशी तक्रार करण्याची पालकांची हिंमतच नव्हती. काटर्य़ानं नक्की चूक केली असणार, याबद्दल पालकांनाच अधिक खात्री असे. बरं, शिक्षक जेवढय़ा जोरात मारायचे, तेवढय़ाच प्रेमानं त्या मुलाला जवळही करायचे. त्याच्यासाठी तो एक अतिशय हळुवार प्रसंग असायचा. काही शिक्षक स्वभावत:च तापट असत. ते क्वचितप्रसंगी अघोरी म्हणता येईल, अशीही शिक्षा करीत. म्हणजे, उदाहरणार्थ टेबलावर हात ठेवायला सांगून त्यावरून अष्टकोनी पेन्सिल फिरवायची किंवा टेबलाच्या पायाखाली मुलाला पाय ठेवायला सांगून वर्गातल्या सर्वात जाडय़ा मुलाला टेबलावर बसायला सांगायचं वगैरे. चार-पाच मुलांचा संसार चालवण्यासाठी मिळणारा पगार न पुरणारे शिक्षक शाळेव्यतिरिक्त शिकवण्या घ्यायचे आणि त्यातून किमान वाण्याचं तरी बिल भागवायचे. मात्र शिकवणी न लावणाऱ्याकडे ते कधी वाकडय़ा नजरेनं पाहायचे नाहीत, कारण बऱ्याच मुलांच्या पालकांना जादा शिकवणी लावणे ही चैन वाटण्यासारखी स्थिती होती. पण एकूणच वातावरणात शिक्षकांना आपल्या ‘लाडक्या’ विद्यार्थ्यांना मार देण्याची अधिकृत परवानगी होती. गृहपाठ न केलेल्याला वर्गात दिवसभर बाकावर उभे राहायला लावणे, वर्गात दंगामस्ती केल्यास वर्गाच्या बाहेर पायाचे अंगठे धरायला लावणे, शाळेत उशिरा आल्यास हातावर वळ उमटेल, एवढय़ा(च) जोरात छडी मारणे, वर्गात कागदी बाण मारणे किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीचा आवाज करणे अशा कारणांसाठी पाठीत धपाटा घालणे या शिक्षा ‘सामान्य’ या सदरात मोडत, पण अशा शिक्षकांच्या घरी दसरा आणि संक्रांतीला जाऊन सोनं देणे किंवा तिळाची वडी मिळवणे, हा मुलांचा हक्क असे. मुले दुपारपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या शिक्षकांच्या घरोघरी जात तेव्हा त्यांना हा मार किंवा शिक्षा आठवत नसे. मार खाणाऱ्या मुलाला वर्गातील इतर मुले सहसा चिडवत नसत, कारण अशी वेळ कुणावरही येऊ शकते, यावर सर्वाचा विश्वास होता.
शाळेतल्या मुलाने स्वत:हून चूक केली, तर ती त्याच्या लक्षात आणून देण्याच्या या काही सर्वमान्य पद्धतींना गेल्या काही वर्षांत तडीपार करण्याचा निर्धार पालकांनी केला आहे. एकुलत्या मुलीला वा मुलाला शाळेत कोणताही त्रास होता कामा नये, अशी त्यांची भावना असते; पण त्यामागेही एक सुप्त दुखरी बाजू असते. आई-वडील नोकरी करत असल्याने मुलावर अन्याय होतो आहे, या कल्पनेतून त्याच्यावर कौतुकाचा भडिमार करून आत्मशांती मिळवण्याचा तो एक प्रयत्न असतो. एक प्रकारचा ‘गिल्ट’. आपला तो बाब्या, यावर तर त्यांचा ठाम विश्वास असतो. आपला मुलगा शिक्षणात मागे पडतो आहे, याबद्दल आत्मपरीक्षण करण्यापेक्षा शाळेला आणि तिथल्या शिक्षकांना त्यासाठी जबाबदार धरणं अधिक सोपं असतं. मुलगा नापास का झाला, त्याला शिक्षा का केली, तो अभ्यासात का रमत नाही, या प्रश्नांची उत्तरं.. भाकरी का करपली, घोडा का बसला, या प्रश्नांच्या ‘फिरवली नाही’ या उत्तरासारखी ‘शिक्षक लक्ष देत नाहीत’ अशी देता येतात. शाळेतल्या मुलांना सांगितला जाणारा गृहपाठ किती मुले स्वत:च्या ज्ञानावर करतात आणि किती पालक मुलांसाठी करतात, याचे उत्तर ज्याचं त्यानं देणंच अधिक श्रेयस्कर. शास्त्र विषयातले ‘प्रोजेक्टस्’ हा तर पालकांसाठीच तयार केलेला गृहपाठ असतो. दिवसभर नोकरी करून दमून आलेल्या आई-बाबांना रात्रभर खपून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं बंधन असतं. आपल्या बाब्याला खरंच नेमकं काय येतं, किती येतं, त्याला काय आवडतं, काय आणि का आवडत नाही, या आणि असल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं ही पालकांची जबाबदारी असत नाही. एवढाल्या फिया काय उगाच देतो काय? असा प्रश्न पालक आता सहज विचारतात. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत शाळेतून बोलावणं येणं ही एक महाभयंकर गोष्ट असे. काही तरी आक्रीत घडल्याशिवाय असं खास निमंत्रण येत नसे. त्यामुळे पालकांचीच छाती दडपायची. आता दर महिन्याला पालकांबरोबर शिक्षकांना सुसंवाद करणे सक्तीचं असतं. त्यात मुलाच्या प्रगतीबद्दल पालकांना सविस्तर विवेचन करणं आवश्यक असतं. पालकही ते सारं गांभीर्यानं ऐकतात आणि क्लास लावून आपली सुटका करून घेतात.
भारतातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक जनतेने शालेय जीवनात शिक्षकांच्या छडीचा मार खाल्ला असेल. त्यापैकी प्रत्येकाला मार देणारे गुरुजी आणि त्यांनी मार का दिला याची कारणं आठवत असतील. वय वाढलं, तरी शाळेतल्या त्या दिवसांची मौज काही संपत नाही. तेव्हाच्या शिक्षकांबद्दलचा जिव्हाळा जसजसे वय वाढत जाते, तसतसा अधिक वाढतच जातो, असा सर्रास अनुभव असतो. शाळेतल्या या व्रात्य वयात मुलांचा टारगटपणा हा शिक्षकांसाठी एक उच्छाद असतो, पण तरीही ते काही मुलांबद्दल वाईटसाईट चिंतत नाहीत. शेवटी शिक्षक हाही माणूसच. त्यालाही पोरंबाळं असतात, त्यांचंही शिक्षण सुरू असतं. आपल्या मुलांनी प्रगती करावी, त्यामुळे शाळेचं नाव उज्ज्वल वगैरे व्हावं आणि परिणामी आपली नोकरी टिकावी, हे इतकं सोपं असलं, तरीही त्यामागे काही कष्ट आणि त्याचा आनंदही दडलेला असतो. शिक्षकांनी मुलांना हात लावला रे लावला की, पालक तातडीने पोलिसांकडे धाव घेतात. शिक्षक हे जणू आपल्या मुलांचे शत्रू क्रमांक एक आहेत आणि त्यांना काही चांगलं पाहावत नाही, याबद्दल त्यांच्या मनात कधीच संदेह नसतो. आपल्या पाल्यानं काही चूक केली तर त्याला मारण्याचा अधिकार फक्त आईबापाचा.. शिक्षकाचा नाही, असा नवा मंत्र आता रुजायला लागलाय. शिक्षाच करू नका, असा हट्ट करणाऱ्या सगळ्या पालकांनी शाळेत असताना भरपूर मार खाल्ला आहे किंवा बोलणी खाल्ली आहेत. तरीही आपल्या मुलांना मात्र मार बसता कामा नये, अशी त्यांची धारणा असते. मार खाल्ल्यानं मूल काही मरत नाही, की आयुष्यभराचं अपंग होत नाही. गुरूकडून मिळालेल्या शिक्षेचा तो एक संस्कारही असतो. ज्या चुकीबद्दल एकदा बोलणी बसतात, ती चूक सहसा पुन्हा होत नाही, असाच सगळ्यांचा अनुभव. आजही शाळेतल्या शिक्षकांबद्दल मुलांच्या मनात जी अपार आदराची भावना ओथंबून वाहत असते, ती त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमामुळेही असते, याचं भान पालकांना असत नाही. मुलं शाळेत जातात, तेव्हा ती शिक्षकांच्या ताब्यात असतात. एखाद्या गोष्टीबाबत शिक्षकांचं मत हे पालकांच्या मतापेक्षा अधिक बरोबर आहे, असंच मुलांना वाटत असतं. हा विश्वास पालक-शिक्षक संघटनेच्या माध्यमातून कमी होता कामा नये याची काळजी घेण्यापेक्षा, आपण शाळेचे मालक आहोत, अशा थाटात शिक्षकांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या समस्त पालकांनी एकदा आपलंही बालपण आठवावं. एवढा मार खाऊन आपलं काही वाईट झालं नाही, उलट चांगलंच झालं, असं त्यांच्या लक्षात येईल.
अघोरी शिक्षा करणाऱ्या शिक्षकांची संख्या सहसा अधिक असत नाही. मुलांना जीव जाईपर्यंत मारणाऱ्या शिक्षकांना वात्सल्य या शब्दाचा अर्थच माहीत नसला पाहिजे. घरातला राग शाळेत येऊन मुलांवर काढायचं ठरवलं की मग असे प्रमाद घडतात. मुलांसमोर बोलताना आपण त्यांच्यापेक्षा हुशार असलं पाहिजे, यासाठी कष्ट करणे हे आपलं कर्तव्य आहे, याची जाणही अलीकडे कमीकमी होताना दिसते आहे. धडे शिकवताना, अधिक माहिती देण्याचं धाडस हल्ली कमी होत चाललं आहे. (पूर्वी पुलंचा धडा शिकवताना त्यांचं सारं साहित्य वाचायची सक्ती केली जात असे!) पूर्वीच्या मानानं आता शिक्षकांचं वेतनमानही खूपच सुधारलं आहे. तरीही पूर्वीच्या मानानं आता त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मात्र खालावल्याचं जाणवत आहे. कमी पगारात संसाराचा गाडा ओढगस्तीनं ओढणाऱ्या शिक्षकांचं सुखनिधान त्यांचे विद्यार्थीच असत. मरेपर्यंत आपण शिकवलेल्या मुलांवर प्रेमाचा आणि हक्काचा वर्षांव करणं, यातही भलंमोठं सुख असतं, याची कल्पना आता पुसट होत चालली आहे. मुलांना आपण ज्ञानाचं काही देणं लागतो, याचं भानही कमी होत चाललं आहे, पण म्हणून सरसकट सगळे शिक्षक मुलांच्या जिवावर उठले आहेत, असा समज करून घेणारे पालक त्यांच्या मनातील अपराधीपणाच्या भावनेला तर कुरवाळत नाहीत ना?   -मुकुंद संगोराम   loksatta