Thursday, 5 April 2012

प्राचीन विचारधन आणि आधुनिक मानव

     भारतामध्ये गेल्या पाच हजार वर्षात ज्या मूल्यांचा पुरस्कार करण्यात आला त्यांचे अनुसरण आणि आचरण आजच्या काळातही तेवढेचावश्यक आहे. परंतु, आपल्या या अमोल वारशाची फारच थोड्या भारतीयांना जाणीव दिसते.
     सोन्याचे पोते आपल्या पाठीवरून वाहणार्‍या गाढवासारखी भारताची अवस्था आहे, अशी माझी खात्रीच झाली आहे. आपण काय वाहून नेत आहोत, हे त्या गाढवाला माहित नसते. आपण ओझे वाहून नेत आहोत, एवढ्यावरच ते खूश असते. हा सुवर्णभार म्हणजे अजब खजिना आहे- कला, वाड्.मय संस्कृती आणि आयुर्वेदासारखी काही शास्त्रे यांचा वारसा आपल्याला प्राचीन काळापासून लाभलेला आहे. 'ऋषिमुनींनी शोधून काढलेला आध्यात्मिक सत्याचा भव्य कोश' असे आदि शंकराचार्यांनी याचे वर्णन केले आहे. सगळ्या जगाचा मार्गदर्शक होण्याची भारतामध्ये क्षमता आहे, असे रवींद्रनाथ टागोर म्हणत.
     प्राचीन भारताची ही सोनेरी देणगी असंख्य ऋषींच्या आणि संतांच्याद्वारा अखंदितपणे आपल्यापर्यंत येऊन पोहचली आहे. यांपैकी काही संतांना जागतिक लौकिक प्राप्त झाला, तर काही अनामच राहिले. आपली संस्कृती प्राधान्याने आध्यात्मिक विकासाशी संबंधित असल्यामुळे आजच्या युगात विशेषच महत्त्वाची ठरते.  कारण, भौतिकवादी प्रगतीचे निर्थकत्व सगळ्यांनाच कळून आले आहे. श्री. अरविंद म्हणत, 'प्राचीन भारत अजूनही जिवंत आहे, अजून त्याने आपला अखेरचा सर्जनशील शब्द उच्चारलेला नाही. प्राचीन भारताचे अस्तित्व अजून टिकून असून स्वतःच्या आणि सार्‍या मानव जातीच्या कल्याणासाठी त्याला बरेच काही करायचे आहे.'
     भारत शाश्वत आहे, चिरकालीन आहे. येथील प्रारंभकाळामधील अनेक संस्कृती इतिहासाच्या धूसर प्रकाशात विरून गेलेल्या असल्या तरी या भूमीला चिरतारुण्याचे वरदान लाभलेले आहे. भारतातील संस्कृती कालातीत असून, ख्रिस्त जन्माच्या वीस शतके अगोदर तिला जेवढे महत्त्व होते तेवढेच ते आपल्या या विसाव्या शतकातही टिकून राहिलेले आहे. संपूर्ण मानववंशाचा अभ्यास केल्यानंतर डॉ. अरनॉल्ड टायनबी म्हणतात," मानव जातीला आत्मविनाश करून घ्यायचा नसेल तर पाश्चिमात्य प्रारंभ असलेल्या प्रकरणाचा भारतीय समारोप होणे आवश्यक आहे, हे आता सगळ्यांनाच कळून आले आहे. मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक क्षण सध्या अवतरला असून मानवजातीने भारतीय मार्गाचा अवलंब केला तरच तिची सांप्रतच्या गंभीर संकटातून सुटका हो ऊ शकेल. सम्राट अशोक आणि महात्मा गांधी यांनी पुरस्कारलेली अहिंसा आणि श्रीरामकृष्ण परमहंस यांनी प्रतिपादन केलेला सर्वधर्मसमभाव हाच तो भारतीय मार्ग होय. मानवजातीने तो अनुसरला तर एका कुटुंबाचे घटक म्हणून तिची वाटचाल हो ऊ शकेल. सध्याच्या अणुयुगात आपल्याला आपला नाश करून घ्यायचा असेल तर भारतीय मार्गाशिवाय पर्यायच नाही."
      तायनबी यांच्या या विवेचनात भारताच्या प्राचीन ऋषींनी पुरस्कारिलेल्या वसुधैव कुटूंबकम या आदर्शाचाच पडसाद उमटला आहे. संपूर्ण विश्व चैतन्यमय असून हे चैतन्य सर्वोच्च आणि अपरिवर्तनीय आहे आणि भौतिक जग हा त्या चैतन्याचा केवळ आविष्कार आहे, हेच सर्व मूलभूत सूत्रांमधील अत्यंत मूलभूत सूत्र आहे. भारताला हजारो वर्षापूर्वीच या सूत्राचा साक्षात्कार झाला आनि त्याचे अपरिमित महत्त्वही कळून आले. आजचे अत्यंत प्रगत देश अजूनही त्या बाबतीत अंधारातच गुढ भौतिक परिभाषेने कधीच उकलणार नाही. आजचे अवाढव्य ज्ञान ऋषींच्या बुद्धिपलिकडे जाऊच शकत नाही, तसेच अत्यंत प्रगत अवस्थेतील विज्ञान वेदांताच्याच अधिक जवळ गेले आहे.
     उच्च मोल्यांचा आग्रह धरल्यामुळे प्राचीन भारताला महानता प्राप्त झाली. त्या मूल्यांपेक्षा अधिक उदात्त मूल्ये शोधून काढणे अशक्य आहे. आपल्या प्राचीन मुनींनी कोणत्याही देशाचा मोठेपणा त्याच्या साम्राज्यावरून किंवा त्याच्या संपत्तीवरून मोजला नाही. सार्वजनिक प्रशासनामध्ये आणि नागरिकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कर्तव्य आणि करुणा यांचा किती आढल होतो, या निकषावरच ते मोठेपणा ठरवित असत. माणसाची खरी प्रगती त्याच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासावर अवलंबून असते, भौतिक वा ऐहिक दर्जावरून ती ठरत नाही, हाच आपल्या ऋषिमुनींना सनातन संदेश होता. यशापेक्षा त्यागाला अधिक मान दिला जात असे. लोभ आणि मोह यांच्यापासून मुक्त होण्यात माणसाचे सर्वोच्च कर्तृत्व सामावलेले आहे, अशी त्यांची धारना होती. संपत्ती किंवा सत्ता यावरून नागरिकाचे समाजातील स्थान ठरत नसे. व्यासंग, दानत आणि निष्ठा हे नागरिकांच्या प्रतवारीचे निकष असत. भगवान बुद्धांचा सच्चा अनुयायी असलेला सम्राट अशोक हे या उदात्त प्रथेचे उत्कृष्ट उदाहरण होय. अशोक सम्राट असूनही बौद्ध भिक्षूंचे दर्शन होताच त्यांना लवून वंदन करीत असे. या एवढ्या मोठ्या सम्राटाने भिक्षूंसमोर नतमस्तक होणे चुकीचे आणि अनुचित आहे, असे त्याचा मंत्री यश याचे मत होते. अशोकने त्याला उत्तर दिले," या भिक्षूंना प्रणाम करून व्यासंग , ज्ञान आणि त्याग या गुणांसंबंधीचा माझा परमादर मी व्यक्त करीत असतो. यश, माणसाचा दर्जा वा स्थान यांच्यापेक्षा त्याचे सदगुण आणि ज्ञान यांनाच जीवनात महत्त्व असते. कुरुप दिसणार्‍या शरीरातही उदात्त मन आणि अंतःकरण वसू शकते. तू जेव्हा तुझे अज्ञान दूर करशील तेव्हाच तुला मानवजातीच्या महासागरामध्ये फारच थोडे महात्मे आहेत, हे कळून येईल. कवडी किंमतीच्या गारगोट्यांमध्ये एखादे जरी रत्न आढळले तरी खरा रत्न पारखी ते लगेच ओळखू शकतो."
     धर्म या संस्कृत शब्दाचा इंग्रजीमध्ये उचित अनुवाद करता येत नाही. सदवर्तन, कर्तव्य, मूलभूत नियम, नैतिकता अशा संकल्पनाम्चा धर्म या शब्दामध्ये अंतर्भाव होतो.
     धार्मिक स्वातंत्र्याची आणि सहिष्णुतेची परंपरा भारतात कधीही खंडित झालेली नाही. सत्य हे कोणत्याही पंथाची वा संप्रदायाची मिरासदारी हो ऊ शकत नाही, या जाणिवेतूनच त्या परंपरेचा उदय झाला. 'प्रत्येक दिशेकडून आमच्याकडे श्रेष्ठ विचार येवोत,' ही ऋग्वेदातील प्रार्थना जगप्रसिद्ध आहे.
      प्रत्येक माणसाला स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात आणि आत्म्याची अंतिम विकासावस्था गाठण्यासाठी स्वतःच आध्यात्मिक अनुभव घ्यावा लागतो, हे सत्य आपल्या ऋषिमुनींना उमगले होते. कोणत्याही व्यक्तीचा वा ग्रंथाचा अधिकार स्वतः विचार न करता मान्य केला की आध्यात्मिक अर्धांगवायूचा प्रादुर्भाव झालाच म्हणून समजा. श्रुती जे काही सांगत आहेत ते मुकाट्याने मान्य करणे पुरेसे ठरत नाही. ही अभिवृद्धी कशी साध्य करावी यासाठी ठराविक नियम नसतात. ज्याचा त्यानेच हा अनुभव घ्यावा लागतो. मोक्षप्राप्तीचा मार्ग अत्यंत अरुंद असून त्याच्या दोन्ही बाजूंना खोल विवरे असतात. तीक्ष्ण, धारदार पात्यावरून वाटचाल करण्याइअतके ते महाकठीण असते, असे कठोपनिषदात म्हटले आहे.
ध्यानधारणेतून दैवी शक्तीचा साक्षात्कार घडतो. त्यासाठी चिरंतनाच्या शिखरावर आपल्या आंतरिक चैतन्याने शांत विहार करणे आवश्यक असते. ध्यानधारणेइतकेच कर्मही महत्त्वाचे ठरते. प्रार्थना किंवा कर्म किंवा ज्ञान हे मुक्तीचे मार्ग होत. अविरत कर्म आणि अखंडित विश्रांती यांचा गूढ समन्वय म्हणजे श्रीअरविंदसारख्या महायोग्यांचे जीवन, भगवद्गीतेने म्हटले आहे: " जो कर्मात विश्रांती आणि विश्रांतीत कर्म अनुभवतो तोच खरा ज्ञानी होय, त्यालाच योगी म्हणावे."
      सत्याचा शोध करणार्‍या सर्वांनाच वेदांत मार्गदर्शक ठरतो, असे स्वामी विवेकानंदांनी 'कर्मयोगी' या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात म्हटले आहे. ते लिहितातः " नि:स्वार्थ बुद्धी आणि सत्कर्म यांच्यायोगे मोक्ष प्राप्त करण्याचे साधन म्हणजे कर्मयोग. नीती आणि धर्म यांच्या पायावर कर्मयोग उभा सतो. कर्मयोग्याचा कोणत्याही सिद्धांतावर विश्वास नसला तरी चालू शकते. तो नास्तिक असला तरीही बिघडत नाही." सहिष्णुता आणि सामंजस्य, शांतता आणि सदिच्छा यांचा अंगिकार केल्याने ब्रम्हज्ञान प्राप्त होते. मोक्षप्राप्तीचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असतात, हे ओळखले पाहिजे.
     अहिंसा, शांतता आणि अनाक्रमण ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. पाच हजार वर्षांच्या आपल्या गतिमान इतिहासामध्ये भारताने अनेक विशाल आणि वैभवशाली साम्राज्ये उभारली; परंतु आपल्या सीमेबाहेरच्या कोनत्याही प्रदेशावर ऐनिकी आक्रमण केले नाही. सहिष्णुता अंगी बाणलेली असल्यामुळेच आपण भारतीय लोक दु:ख आणि अन्याय निमुटपणे सहन करतो. एवढे अन्याय दुसर्‍या कोणत्या देशात घडून आले असते तर तेथे रक्तरंजित राज्यक्रांतीचे तांड्व उफाळून आले असते.
     सध्याचा काळ अध्यात्मिक निरक्षरतेचा आहे. पैसा मिळवता येतो; परंतु त्यामुळे सुखप्राप्ती होतेच असे नाही, याचा लोक अनुभव घेत आहेत. जीवनातील काव्याचा नाश करून ते स्वतःच स्वतः ला फसवीत आहेत. अशा वेळी खरा विकास मानवाच्या चैतन्याशी निगडित असतो, हे आपण ओळखले पाहिजे. ऐहिक प्रगती म्हणजे आत्मिक प्रगती नव्हे. जेव्हा तंत्रविज्ञान नैतिक विकासाला मारक ठरते तेव्हा विनाश घडून येणे अपरिहार्य होते. आत्म्यांचे प्रमाणिकरण करण्याच्या आणि कळपामध्ये मुक्ती शोधण्याच्या आजच्या काळात आपला प्राचीन वारसाच तारक ठरू शकेल.
     अनेक शतके मागे पडली; परंतु त्या वारशाचे तेज किंचितही उणावले नाही. उन्मत आक्रमकांनी या भूमीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले; परंतु येथील संस्कृती अभेद्यच राहिली.
      सी. राजगोपालाचारी यांनी म्हटले आहे," भारतात आजही थोडासा प्रामाणिकपना, आदरातिथ्य, पावित्र्य, बंधुभाव, भूतदया, पापपुण्यविवेक शिल्लक राहिला असेल तर त्याचे श्रेय आपल्या प्राचीन संस्कृतीलाच द्यावे लागेल."
     राजाजींनी ज्या प्राचीन संस्कृतीचा उल्लेख केला ती केवळ हिंदूपुरती, किंवा भारतीयांपुरती मर्यादित नसून विश्वव्यापी आहे. मानवजातीचे अत्यंत प्रगल्भ पांडित्य उपनिषदांमध्ये सामावलेले आहे, असे राजाजी म्हणत. हे पांडित्य, हा संदेश केवळ भारताच्या पुनर्निर्माणासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या पुनर्प्रशिक्षणासाठी अत्यंत उपकारक ठरू शकेल.
         ..                                                                                     -          नानी पालखीवाला
                                                                                   पुस्तक- वुइ, दि नेशन ( वाया गेलेली वर्षे)

शिक्षण व्यवस्थेची श्‍वेतपत्रिका


महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत राज्याने शिक्षणामध्ये केलेली प्रगती., शिक्षणाची आजची स्थिती, त्यातील नवी आव्हाने, गुणात्मक विकास, गाठावयाचा पल्ला, शाळाबाह्य मुले या सर्वांचे वास्तव चित्र समोर यावे, म्हणून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधान परिषदेत केली. येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही पत्रिका जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधान परिषदेत चर्चा उपस्थित केली होती. तब्बल तीन तासांहून अधिक काळ ही चर्चा झाली. त्याला दर्डा यांनी आज सविस्तर उत्तर दिले. शासनाची शिक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करीत अनेक महत्त्वाचे नवे निर्णयही त्यांनी जाहीर केले. (lokmat)