Saturday, 22 December 2012

जांभ्या खडकावरची हिरवळ

राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची आदर्श प्राथमिक शाळा आहे. या शाळेची पटसंख्या आहे अवघी १८, पण या छोटय़ाशा मुलांनी, शाळेतील दोघा शिक्षकांनी व शाळेवर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांनी शाळेसाठी केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून ही शाळा रत्नागिरी जिल्ह्य़ात खरोखरीची 'आदर्श' शाळा म्हणून ओळखली जाते.
राजापूर तालुक्यातील  घरवंदवाडीच्या या शाळेने आतापर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळविले आहेत. या सन्मानाला शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा हातभार आहे. हे उपक्रम पुढीलप्रमाणे..
शालेय परिसर- या शाळेत प्रवेश करताच दर्शनी पडते ती सुंदर बाग, बागेत बागडणारी फुलपाखरे, हवेत डोलणारे गुलाब. प्रवेशद्वारावरील कुंदाच्या झाडावरील फुलांच्या दरवळीने धुंद होतच शाळेत प्रवेश होतो. या बागेत जास्वंद, चाफा, गुलाब, मोगरा, कमळ, तगर, कोरफड, तुळस, दालचिनी, अडुळसा, काळीमिरी, गवती चहा, जस्टेशिया, यलो डय़ुरांटा, टोपिओका, अलामेडा, कुपिया यांसारखी अनेक झाडे, अशोकासारखी उंच झाडे व काजू, केळी, नारळ, फोफळीसारखे कोकणाचे सौंदर्य पाहता येईल.
उत्पादक उपक्रम - मुलांमध्ये भावी उद्योजकाचे स्वप्न पाहण्यासाठी शाळेने अनेक उत्पादक उपक्रम राबविले आहेत. यात गांडूळ खत, कंपोस्ट खतनिर्मिती, केळी, सुवासिक द्रव्ये, लिक्विड सोप, नीळ, अगरबत्ती, फिनेल, पत्रावळ, लाडू, चिवडा, लोणचे, आवळा, सुपारी, सीमेंटच्या कुंडय़ा यांचे उत्पादन होते.
धनलक्ष्मी बचत बँक - बँकेचे व्यवहार करताना गोंधळ उडू नये म्हणून मुलांना शाळेत स्थापलेल्या धनलक्ष्मी बँकेचे सर्व व्यवहार सांभाळण्यास दिले जातात. बँकेत पैसे काढण्यासाठी चलन आहे. प्रत्येक मुलाचे पासबुक आहे. महाराष्ट्र दिनी प्रत्येक मुलाचे खाते बंद करून पुढील वर्षांचा खर्च भागविण्यासाठी जमा पैसे पालकांना दिले जातात.
संगणक शिक्षण - संगणक शिक्षण काळाची गरज असल्याने शाळेने शैक्षणिक उठावाअंतर्गत संगणक घेतला. आता शाळेतील सर्व मुले त्याचा वापर करतात, हाताळतात. इतिहासात डोकावताना - शाळेने शिवरायांच्या जीवनातील काही सोनेरी क्षण भिंतीवर रेखाटन करून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासात डोकावण्यात मदत केली आहे. शालेय आवारात बांधीव किल्ला प्रतिकृती उभारून आपल्या वारशाचे जतन कसे करावे याचीही शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे.
परिसरातून अध्ययन - शाळेच्या आवारात 'शब्दपथ' नावाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या शब्दपथावर १६२ इंग्रजी व १०० मराठी जोडाक्षरी शब्दांचे लेखन केले आहे. विद्यार्थी जाता-येता किंवा खेळताखेळता हे शब्द वाचतात. त्यामुळे ते लक्षात ठेवणे सोपे जाते.
याप्रमाणे १ ते १०० अंकांचे लेखनही करण्यात आले आहे. गणितातील संख्याज्ञानावर आधारित अनेक मनोरंजक खेळ येथे घेता येतात. बागेतील झाडांवर त्यांची इंग्रजी, मराठी नावे लिहिण्यात आली आहेत. सेंद्रीय शेती - प्रत्येक विद्यार्थ्यांला बालवयातच सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटविण्यात येते. त्यासाठी आवारातच गांडूळ, कंपोस्ट, नॅडेप खत, व्हर्मी वॉश प्रकल्प राबविण्यात आले आहेत. यातून मिळणाऱ्या खताचा वापर बागेसाठी वांगी, केळी, भाज्या, पडवळ, कारले, काकडी लागवडीसाठी केला जातो. शालेय पोषण आहारात या उत्पादनांचा समावेश केला जातो. या प्रकारच्या र्सवकष शिक्षणातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासही मदत होते. गेली पाच वर्षे शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागतो आहे.
शाळेने राबविलेल्या या उपक्रमांची दखल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन पाटील यांनी घेऊन 'जांभ्या दगडावरील हिरवळ' नावाची चित्रफीत तयार केली. इतर शाळा शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी या चित्रफितीचा वापर केला जातो. २०१० साली शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, २०११ मध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
(loksatta)

शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी स्टोअर्स आणि बरेच काही

रिसोड अकोला मुख्य रस्त्याला लागून पैनगंगा नदीच्या काठावर जिल्हा परिषदेची किनखेडा प्राथमिक शाळा आहे. वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ही शाळा वाशीम जिल्ह्य़ात नावारूपास आली आहे.
शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत व तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत वर्षभर विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतून सर्वागीण विकास घडविला जातो. यापैकी काही महत्त्वाचे उपक्रम पुढे दिले आहेत.
लोकशाही पद्धतीने निवडणूक - शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला पालक मेळावा घेऊन संपूर्ण वर्षांचे नियोजन दिले जाते. वर्षभर कोणी कोणत्या जबाबदारी घ्यावयाच्या यासाठी सर्वप्रथम मुलांचे मंत्रिमंडळ निवडणूक घेऊन तयार केले जाते. राज्याचे मंत्रिमंडळ जसे काम करते त्याप्रमाणे शालेय मंत्रिमंडळाचे काम चालते.
मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे मुलांना लोकशाही व्यवस्थेचे प्राथमिक धडे मिळतात.
विद्यार्थी स्टोअर्स - शाळा ग्रामीण भागात असल्याने येथे विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक सामग्री सहज उपलब्ध होत नाही. म्हणून आम्ही शाळेत विद्यार्थी स्टोअर्स नावाचे छोटे दुकान थाटले आहे. यात विद्यार्थ्यांना लागणारी सर्व शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून दिली जाते. हे सर्व साहित्य ना नफा, ना तोटा या तत्त्वावर विकले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच गरजेप्रमाणे वह्य़ा, पेन, पेन्सिल, चित्रकलेचे साहित्य उपलब्ध होते. याची जबाबदारी चौथीतील शाळा विद्यार्थ्यांकडे दिली आहे.
यामुळे छोटय़ा-मोठय़ा वस्तूंसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचतो.विद्यार्थी बचत बँक - विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी व बँकेच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून शाळेतच विद्यार्थी बचत बँक स्थापन केली आहे. या बँकेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे खाते उघडले आहे.
विद्यार्थी बँकेत पैसे टाकतात व काढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँकेच्या व्यवहाराची चांगली माहिती झाली आहे. या बँकेतर्फे विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी स्टोअर्समधून एखादी वस्तू विकत घ्यायची असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर बँकेतर्फे त्याला बिनव्याजी कर्ज दिले जाते. व तो विद्यार्थी त्याच्याकडे पैसे आल्यावर पैसे बँकेत भरतो. शाळेच्या बँकेत दोन ते अडीच हजार रुपये नेहमी असतात.
स्नेहसंमेलन - हा आमच्या शाळेत राबविला जाणारा सर्वात वैशिष्टय़पूर्ण उपक्रम आहे. २६ जानेवारीच्या दिवशी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. हा दिवस आम्ही एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतो. या दिवशी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धासाठी बक्षिसे दिली जातात. तसेच विद्यार्थीही शाळेला विविध उपयोगी भेट देतात. या स्नेहसंमेलनामुळे मुलांमधील विविध कलागुणांना वाव मिळतो.

Saturday, 1 December 2012

लोकसहभागातून साकारले ज्ञानाचे मंदिर

परभणीच्या मानवत तालुक्यातील मंगरूळ या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत काही वर्षांपूर्वी सात वर्गासाठी पत्र्याच्या तीन खोल्या, एक स्वच्छतागृह, थोडीशी काटेरी बाभळींनी वेढलेली जागा, चारही बाजूने उकिरडे व शाळेच्या जागेत शेतकऱ्यांची अतिक्रमणे असे चित्र होते. शाळेचा गावापासूनचा ३०० मीटरचा रस्ता गावातील सांडपाण्यामुळे चिखलमय व बाभळीमुळे काटेरी बनला होता, पण लोकसहभागातून येथील शिक्षकांनी शाळेचा कायापालट करून दाखविला आहे..
शाळेची स्थिती सुधारण्याबरोबरच नवीन भौतिक सुविधा वाढविण्याचे आव्हान होते. त्यासाठी पहिल्यांदा शाळेत विशेष पालक सभेचे आयोजन करण्यात आले. एक शिक्षकी शाळा असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आधी प्रति विद्यार्थी १० रुपये जमा करून अध्यापनासाठी एका स्वयंसेविकेचे नेमणूक करण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यात शाळा व्यवस्थापनाने १८ हजार रुपये इतकी लोकवर्गणी जमा करून या पैशातून शाळेच्या भोवतालची काटेरी बाभळी काढून टाकणे, सपाटीकरण करणे, मैदान व आवारातील खड्डे रेतीने बुजविणे आदी कामे सुरू केली. जवळपास ३० ट्रॅक्टरइतकी रेती खड्डे बुजविण्यासाठी लागली. त्यानंतर लोकांनी विश्वासात घेऊन त्यांचे उकिरडे व आखाडे दूर करून शाळा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. यामुळे शाळेला प्रशस्त मैदान मिळाले. मैदानावर १०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थी-पालकांकडे देण्यात आली. शाळेसाठी सिमेंट रस्ता बनविण्यात आला. तसेच शाळेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यात आली.
विद्यार्थ्यांना गणवेश, टाय, ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले. त्यांची उपस्थिती १०० टक्केराहावी यासाठी रंजक उपक्रम हाती घेण्यात आले. सरस्वती वंदना कार्यक्रमांतर्गत गुणदर्शन मंच स्थापन करून माता-पिता शुभदर्शन, विद्यार्थी स्वयंपरिपाठ शालेय मित्र मंडळ, निसर्ग सहली, शालेय सहभोजन, सत्यबोल वचन आदी उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांची अभिरुची जोपासण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली, आनंद मेळावा यांचे आयोजन होऊ लागले.
 दरवर्षी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, कापडी पडदे, नक्षीकाम केलेल्या वस्तू, शिंपले, शंख, विविध बिया, पाने-फुले, मातीचे नमुने, चित्रकला रेखाटणे, कागदी पिशव्या, फुलदाण्या, खाऊचे पदार्थ यांचे प्रदर्शन भरविले जाते. गावकरी या वस्तू प्रेमाने विकत घेतात. गावकऱ्यांचा शाळेच्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद असतो.
 शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गावकऱ्यांनी दरवेळी १५ ते २० हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे.
बक्षिसांच्या रकमेतून संपूर्ण आवाराला लाकडी व काटेरी कुंपण करण्यात आले. काळाची गरज ओळखून संगणक खरेदी करण्यात आले. शाळेमागील पडीक जमीन उपजाऊ करून त्यात कापूस शेती करण्यात आली. शाळेने कचऱ्याचे व्यवस्थापन करून गांडूळ खत प्रकल्प पूर्णत्वाला नेला. त्याचा लाभ शाळेतील वृक्ष व कापूस शेतीसाठी केल्याने शाळेचा परिसर हिरवागार व निसर्गरम्य बनला आहे. गावकऱ्यांनी वर्गणीतून विद्यार्थ्यांना बसण्याची बाके उपलब्ध करून दिली आहेत. या बदल्यात शाळेने गावकऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमापासून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता असे जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात मदत केली.
 संपूर्ण स्वच्छता अभियानात शाळेने सहभागी होऊन गावाला २००७-०८चा निर्मल ग्राम पुरस्कार मिळविण्यात मोठा हातभार लावला. शाळेचा गुणात्मक दर्जा तीन शिक्षक व लोकवर्गणीतून मिळालेले दोन स्वयंसेवक यांच्या मदतीने वाढविण्यात आला आहे. आदर्श शाळा पुरस्कार पटकावण्याबरोबरच शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती व अन्य परीक्षेत चमकत आहेत. अशा प्रकारे लोकसहभागातून विधायक कामे करून शाळेने गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

शिक्षण : विनाघंटेची शाळा

बुलढाण्याच्या मोताळा येथील सावरगावची जिल्हा परिषदेची शाळा ना घंटा वाजवून भरते ना सुटते. तरीसुद्धा येथील मुले दररोज शाळेच्या एक तास आधी शाळेत पोहोचतात आणि संध्याकाळी शाळा बंद करूनच परततात. हे शक्य झाले आहे इथल्या दोन शिक्षकांनी अथक प्रयत्नांनी राबविलेल्या सर्जनशील उपक्रमांमुळे..
अवघे ६६ विद्यार्थी असलेल्या या द्विशिक्षकी शाळेत मुख्याध्यापक दीपक चव्हाण व शिक्षक प्रवीण वाघ हे दोन शिक्षक जेव्हा रुजू झाले तेव्हा शाळेभोवती कुंपण नव्हते व परिसर चिखलाने भरला होता. गावातील भटक्या जनावरांसाठी ही हक्काची जागा होती. गावातील शिक्षणविषयक वातावरणदेखील फार पोषक नव्हते. पण आता शाळेभोवती कुंपण उभारून हिरवळ तयार करण्यात आली आहे.
शाळांच्या भिंती आकर्षक चित्रांनी व सुविचारांनी भरल्या आहेत. 'सेव्ह दी चिल्ड्रेन' या बालहक्कासाठी काम करणाऱ्या उपक्रमांतर्गत येथील शिक्षकांना सर्वसमावेशक व मैत्रीपूर्ण वातावरणात कसे शिकवायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळेच्या वातावरणाबरोबरच येथील शिक्षण पद्धतीमध्ये काही मूलभूत बदल केले गेले आहेत.
शाळा व्यवस्थापन - शाळेत दरवर्षी निवडणुका होतात. उमेदवार आपला अर्ज भरून दिवसभर शाळेत प्रचार करतात. दुपारी मतदान होऊन संध्याकाळी निर्णय जाहीर होतात. यातून मुख्यमंत्री तसेच स्वच्छता, प्रशासन, क्रीडा, शिस्त आदी खात्यांचे मंत्री निवडले जातात. शाळेचे बरेचसे नियमन व कामकाज या मंडळाकडूनच होते. कार्यक्रमांची व उपक्रमांची तयारी करणे व ते राबविणे हे समित्या चोख पार पाडतात. मुले शाळेच्या कपाटातील दस्तऐवज स्वत: हाताळू शकतात.
मुक्त प्रयोगशाळा - प्राथमिक शाळा असूनही येथील प्रयोगशाळेत सातवीपर्यंतचे मुलांना प्रयोग हाताळता येतात. उदा. कंगवा आणि कागदाचे तुकडे यातून स्थितीज ऊर्जा समजून घेणे, फुग्याच्या साहाय्याने श्वसन प्रक्रिया समजून घेणे, शिक्षकांनी मुलांची आकलन क्षमता वाढीस लागेल असे काही प्रयोग स्वत: तयार केले आहेत. उदा. धरण व वीजनिर्मिती प्रक्रियेचा मॉडेल, सजीव, निर्जीव ओळखण्यास मदत करणारा इलेक्ट्रॉनिक खेळ.
बचत खाते - बँकेचे कामकाज समजून देण्यासाठी शाळेतच बँक सुरू करण्यात आली आहे. दर शनिवारी विद्यार्थी त्यांच्याकडील जमविलेले पैसे शाळेतील बँकेत जमा करतात. हे पैसे त्यांना गरजेप्रमाणे काढण्याची मुभा आहे अथवा प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते त्यांना एकत्रित परत देण्यात येतात. काही दिवसांपूर्वी जमा झालेल्या पैशांमधून विद्यार्थ्यांनी गावातील एका तरुणाच्या उपचारासाठी पैसे उपलब्ध करून दिले होते.
ध्वनिक्षेपक यंत्रणा - अनेकदा एकाच शिक्षकावर शाळा सांभाळण्याची वेळ येत असल्याने प्रत्येक वर्गात ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात आली आहे. याद्वारे शिक्षक-विद्यार्थी एकमेकांशी संवाद साधतात. शिवाय ध्वनिक्षेपकाद्वारे बोधपर गोष्टी, गाणी व पाढे लावून मुलांना गुंतवून ठेवता येते.
गटशिक्षण आणि ज्ञानकुंड - प्रत्येक वर्गामध्ये पाच मुला-मुलींचे गट करून ते ज्ञानकुंडाभोवती बसून एकत्र अभ्यास करतात. ज्ञानकुंड म्हणजे दोरीच्या आधारे सोडलेल्या बास्केटमध्ये अभ्यासक्रमाशी निगडित विविध माहितीपर नोट्स व चित्रे जमा केलेली असतात.
पाठे पाठांतर - दररोज अर्धा तास सर्व शाळेतील मुले पटांगणात बसून पाढे म्हणतात. लहान इयत्तेतील मुलांना पाढे पाठ नसले तरी ते मोठय़ा मुलींच्या मागून म्हणतात. त्यामुळे येथील विद्यार्थी पाढे उलटसुलट व आडवेदेखील म्हणून शकतात. उदा. बे दुणे चार, तीन दुणे सहा.
इंग्रजी शब्दसंग्रह - शाळेतील प्रत्येक वस्तूवर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे लिहिले आहे. उदा. खुर्चीवर 'चेअर' असे लिहिले आहे. शिवाय वर्गात येताना व जाताना परवानगी घेण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी शब्द, त्याचा अर्थ व स्पेलिंग सांगतो.
प्रामाणिक पेटी - शाळेत सापडणारी कुठलीही गोष्ट या पेटीत येऊन पडते. सापडलेल्या पेन्सिली, खोडरबर, पैसे या वस्तू पेटीत आणून टाकताना मुलांना गर्व वाटतो.    ( loksatta)

शिक्षण : व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर

शिरूरच्या  नगरपालिका शाळा क्रमांक ६मध्ये विविध स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध स्तरातील पालकांची-विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन उपक्रमांची आखणी केली जाते. त्यासाठी समाजातील विविध सामाजिक संस्था व शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्ती शाळेच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.
शाळेत शिस्तपालन व वक्तशीरपणा या गोष्टींना महत्त्व दिले जाते. त्यातही स्वयंशिस्त राखण्यावर विशेष भर असतो. शाळेत प्रवेश करताच क्षणी इमारतीच्या परिसरातील बोलक्या भिंती लक्ष वेधून घेतात. शाळेच्या भिंतींचा प्रत्येक कोपरा आपणाला काही तरी सांगत असतो.
शालेय कामकाजाची सुरुवात दैनंदिन स्वच्छतेच्या कामाने होते. विद्यार्थी आपापला वर्ग, व्हरांडा स्वच्छ करतात. त्यातून श्रमप्रतिष्ठेचे मूल्य त्यांच्यावर बिंबवले जाते. परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना याचबरोबरच चालू घडामोडींविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न होतो.
शाळेत विविध सण, समारंभ आवर्जून साजरे केले जातात. हे करताना पारंपरिकता व आधुनिकता यांचा मेळ घातला जातो. सण साजरे करण्यामागचे ऐतिहासिक संदर्भ, पौराणिक कथा सांगितल्या जातातच शिवाय आजच्या बदलत्या काळात हे सण आपण कशा प्रकारे साजरे केले पाहिजेत याचे मार्गदर्शन केले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरू, माता, पिता, यांना वंदन करण्याबरोबरच नद्या, वृक्ष, सागर, आकाश या नैसर्गिक रूपांचेही आपण वंदन केले पाहिजे हे मनावर ठसविले जाते. यामुळे निसर्गाशी असणारी बांधीलकी समजते.
गणेशोत्सवानिमित्त विविध विषयांवरील स्पर्धाचे आयोजन होते. हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी, गीतगायन, कथाकथन, मनोरंजनात्मक खेळ वगैरे. स्पर्धेतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाबरोबर मार्गदर्शनही लाभते.
नवरात्रातील भोंडल्यात पारंपरिक गीतांबरोबरच पर्यावरणपर गीते म्हटली जातात. पर्यावरण गीतांद्वारे निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश दिला जातो. आमच्या माता, पालक, भगिनी या कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच संक्रातीनिमित्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याशी निगडित वस्तू वाण म्हणून वाटल्या जातात. जेणेकरून त्या वस्तूचा उपयोग त्यांच्या पाल्याला होईल. या कार्यक्रमातून शाळेला समाजाशी जोडण्याचे काम आम्ही करतो.
विद्यार्थ्यांना निसर्ग निरीक्षणाची सवय लागवी, ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंची माहिती व्हावी, महती समजावी यासाठी शैक्षणिक सहली व क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. या निमित्ताने शिरूर सत्र व दिवाणी न्यायालय, नगरपालिका कार्यालय, विविध बँका, पोस्ट ऑफिस, जलशुद्धीकरण केंद्र, हवामान केंद्र, कागद कारखाना या ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी मिळविली आहे. आमचे शिक्षकही इतर उत्कृष्ट व आदर्श शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणचे चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतात. शाळेत गीतमंच असून त्या माध्यमातून अनेक गीतांची तयारी करवून घेतली जाते. समूहगीते, देशभक्तीपर गीते, अभंग, भक्तीगीत यांचे गायन केले जाते. लेझीम पथक, ढाल-तलवार पथक, झांजपथकही तयार आहे. विविध राष्ट्रीय नेत्यांच्या जयंतीनिमित्त, स्मृतिदिनानिमित्त आयोजिल्या जाणाऱ्या बालसभांचे नियोजन विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने करीत असल्याने त्यांच्या अंगातील नेतृत्वगुणांना चालना मिळते. कविता पाठांतर, गायन, पाढे पाठांतर, नकाशे भरणे, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, विविध प्रकारचे संग्रह करणे यांतून विद्यार्थी अनुभवसमृद्ध करण्यावर शाळेचा भर असतो. आता शालेय परिसरात मुलांच्या खेळण्याच्या साहित्यासह बालोद्यान करण्याचा विचार आहे.

गणिती कोडी, शब्दांची बाग आणि बरेच काही!

जालना-औरंगाबाद महामार्गावर वसलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचा उल्लेख प्रत्येक विद्यार्थी-शिक्षक 'माझी शाळा' म्हणून अभिमानाने करतात. कधीकाळी या शाळेत पिण्याच्या पाण्याचीही वानवा होती, पण या आणि यांसारख्या असंख्य प्रश्नांवर मात करून ही शाळा आता या भागातील आदर्श शाळा म्हणून दिमाखाने उभी आहे.
पुरेसे पाणी नसतानाही शाळेने आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन शाळेच्या परिसरातील १५ गुलमोहराची झाडे जगविली. आता शाळेत खणण्यात आलेल्या बोअरवेलमुळे झाडांना हक्काचे पाणी तर मिळतेच; त्याशिवाय एक सुंदर बागही शाळेच्या परिसरात फुलू लागली आहे.
टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रयोगही शाळा राबविते. शाळेकडे शिलाई मशीन आहे. या मशीनच्या मदतीने सातवीच्या मुलींनी जुन्या कपडय़ांपासून कापडी पिशव्या शिवून गावात वाटल्या. रद्दी पेपर आणि पुस्तकातून सहावीच्या मुलांनी अनोखे 'तरंग वाचनालय' तयार केले आहे. चॉकलेटच्या कागदांपासून हार, रिकाम्या दूध पिशवीपासून गजरे आणि वेण्या तयार केल्या आहेत. सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या वापरलेल्या ग्लासांपासून तयार केलेले झुंबर आणि तोरणे तर चांगलीच आकर्षक झाली आहेत.
प्रत्येक वर्गामध्ये मंत्रिमंडळे स्थापन केली आहेत. विद्यार्थ्यांच्या या मंत्रिमंडळाद्वारे वर्गाचे व्यवस्थापन केले जाते. प्रत्येकाचा वाढदिवस लक्षात राहावा म्हणून कोलाज चित्रे बनविण्यात आली आहेत. घोटीव कागदाच्या चटया, बांगडीच्या काचेपासून साखळी, वॉलपीस तयार केले आहेत. शाळेत लहान पोस्ट बॉक्स आहे. प्रत्येक विद्यार्थी सणावाराच्या प्रसंगी एकमेकांच्या नावे छोटे संदेश लिहून शुभेच्छा व्यक्त करतात. त्यासाठी प्रत्येक वर्गात एक-एक पोस्टमन नेमला आहे. तो स्वत:च्या वर्गाचे संदेश मुलांना वाटण्याचे काम करतो. आता तर अभ्यास अपूर्ण असल्यास व चूक झाल्यास, गैरहजर राहिल्यास विद्यार्थी शिक्षकांनाही 'मला माफ करा' असा संदेश पाठवू लागले आहेत.
परिपाठास मुलांनी वेळेवर हजर राहावे म्हणून परिपाठ संपवून आम्ही मैदानातच विविध गुणदर्शन उपक्रम राबवितो. यात विद्यार्थी समोर येऊन उत्स्फूर्तपणे कला सादर करतात. यात गाणी, गोष्टी, विनोद, नकला, पोवाडे, मुकाभिनय आदी प्रकार पाहायला मिळतात. ते पाहण्यासाठी व त्यात भाग घेण्यासाठी अलीकडे मुले मोठय़ा संख्येने परिपाठास हजर राहू लागले आहेत. या वेळी जी मुले शाळेत नीटनेटकी किंवा स्वच्छ दिसून येतात त्यांचे सर्वासमोर कौतुक केले जाते. ज्या वर्गाची उपस्थिती १०० टक्के असेल त्या वर्गाचे अभिनंदन करून त्यांना 'उपस्थिती ध्वज' दिला जातो. याचा उपस्थिती वाढविण्यासाठी उपयोग होतो.
मराठीचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी शब्दकोडी, गणितासाठी गणिती कोडीचे प्रयोग सध्या शिक्षक करीत आहेत. गणिताच्या शिक्षकांनी एक मोठ्ठाली सापशिडी तयार केली आहे. त्याचा वापर करून गणिती क्रिया सोडविणे सोपे झाले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञानाच्या शिक्षकांनी आधुनिक शेतीची प्रतिकृती तयार केली आहे. बाभूळ वनस्पतीच्या काटेरी काडय़ांना कागदी फुले लावून फ्लॉवरपॉट तयार केला आहे. इतिहासाच्या शिक्षकांनी मुलांच्या मदतीने किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे. वर्गाच्या कोपऱ्यात मातीपासून भुरूपे तयार केली आहेत. हिंदीतून बोलण्याचा सराव व्हावा यासाठी 'वन मिनिट शो' केला जातो.
पहिलीच्या मुलांना मुळाक्षरांची ओळख व्हावी यासाठी कार्डशीटपासून मुलांच्या नावाचे आद्याक्षर असणारे बिल्ले तयार केले असून ते विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर लावले जातात. उदा. ज्ञानेश्वर नाव असल्यास 'ज्ञ' असा बिल्ला तयार करून शर्टवर पिनने लावायचा. मुले एकमेकांचे बिल्ले पाहतात, चर्चा करतात. यातून मुळाक्षरे त्यांच्या लक्षात राहायला मदत झाली. दुसरीच्या शिक्षकांनी इंग्रजी कवितांवर आधारित 'जम्पअप' चित्रे, कोलाज चित्रे तयार केली आहेत, तर तिसरीच्या शिक्षकांनी शाळेत लवकरच प्रत्यक्षात येणारी 'शब्दांची बाग' फुलविण्यासाठी दोन हजार सोप्या इंग्रजी शब्दांचा संग्रह तयार केला आहे. याशिवाय सर्व वर्गासाठी भाषा विषयाची एक 'वर्ड बँक'पण आहे. प्रत्येक वर्गात भित्तिपत्रके आहेत. विद्यार्थी आपापले सुविचार, चिंतन, लेख, चारोळ्या, विनोद आदी साहित्य त्यावर प्रकाशित करतात.

शिक्षण : फुले फुलविण्यासाठी

मुले देवाघरची फुले मानली जातात. ही फुले वाढविताना त्यांना योग्य वेळी पाणी, हवा, पुरेशी मोकळीक दिली नाही, तर ती फुले बनण्याच्या अगोदरच कोमेजून जातील. म्हणून केवळ घोकंपट्टीवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना, त्यांच्यातील क्रीडाकौशल्यांना जास्तीत जास्त वाव देण्याचा प्रयत्न नंदुरबारच्या 'श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल'मध्ये केला जातो.
आदिवासी भागातील या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना वाव दिला जातो. शाळेत प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळील दोन्ही बाजूंना लावलेले फलक याचीच ग्वाही देतात. १९७० पासून आजपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या क्रीडा सहभागाची मोठी गुणवत्ता यादीच या ठिकाणी पाहायला मिळते.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाबरोबरच दर वर्षी शाळा विज्ञान प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम घेते. तसेच 'नई उडान' नामक भित्तिपत्रकावर विद्यार्थ्यांनी संकलित केलेली माहिती, कात्रणे, शास्त्रज्ञांची माहिती लावली जाते. या उपक्रमांतून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे गेल्या वर्षी 'इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड' या केंद्र सरकारच्या विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या राहुल बागुल नामक विद्यार्थ्यांला पश्चिम महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावण्यात यश आले.
शाळेच्या हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ओझोन दिनाच्या दिवशी २१० झाडांचे रोपण केले, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाडूच्या गणेशमूर्ती तयार करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला.
या वर्षीपासून शाळेने ई-क्लास ही नवी संकल्पना अमलात आणली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविले जाते. दृक-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण चिरकाल टिकणारे असते. त्यामुळे किचकट विषयही सोपे होण्यास मदत होते.
शालेय दशेपासून विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी वेळोवेळी विविध पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना बोलाविले जाते आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या संस्थांकडून शाळेत स्पर्धाचे आयोजनही केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कल या परीक्षांकडे वाढावा.आज मराठी शाळेचे सर्वानाच वावडे आहे. इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढत असतानाही ही शाळा आपले स्थान टिकवून असून मुलांना संजीवनी पुरविण्याचे काम अखंडपणे करते आहे.

राजकारणात शैक्षणिक प्रश्नांची घुसमट

खासगी शिक्षणसंस्थांतील महाग होत जाणारे शिक्षण, हे आजचे खरे आव्हान आहे. सधन वर्ग वगळता कुणालाही उच्च शिक्षण घेता येऊ नये, अशी स्थिती बाजारीकरणामुळे येते आहे.. अशा वेळी शिक्षणाऐवजी अस्मितांचे राजकारण केले जाते, तेव्हा पहिला बळी शिक्षणच ठरते!
'विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
सारे अनर्थ एका अविद्येने केले'
महात्मा जोतिबा फुले यांच्या अखंडातील हे विधान इतके तर्कशुद्ध आहे की अविद्येमुळे होणाऱ्या अनर्थाची कारणपरंपरा सहज स्पष्ट होते. म. फुल्यांसारख्या समाजसुधारकांनी शिक्षणाचे समाजपरिवर्तनातील महत्त्व ओळखले होते. त्यामुळेच शिक्षण समाजातील सर्व घटकांपर्यन्त पोहोचवण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. त्यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या कार्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राचा पाया एकोणिसाव्या शतकात बांधला गेला. महात्मा फुल्यांच्या कार्याचा वारसा पुढे राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विसाव्या शतकात चालवला. बहुजन समाजातील या समाजसुधारकांच्या कार्याला 'फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा' असे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संबोधले जाऊ लागले.
 विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत मंडल आयोगाच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही प्रभाव पडला आणि समाजाच्या मूळ प्रश्नांना बगल देत जातीपातींच्या अस्मितांचे राजकारण अधिक वरचढ ठरू लागले. या काळात बहुजन समाजातीलच ओबीसी व मराठा यांच्या जातीवर आधारित अशा राजकीय अस्मितांना खतपाणी घालण्यात आले. जातीवर आधारित, राजकीय उद्दिष्टे बाळगून उभ्या राहिलेल्या वेगवेगळया सामाजिक संघटना जोर धरू लागल्या. जातीवर आधारलेले राजकीय पक्ष काढणे शक्य नसल्यामुळे अशा प्रकारच्या संघटनांद्वारे आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी हा सोयिस्कर मार्ग निवडला. या संघटना प्रामुख्याने बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचा वारशावर आपला हक्क सांगितला.
नुकतीच नाशिकमध्ये जातीच्या अस्मितांच्या आधारे उभारलेल्या दोन संघटनांची अधिवेशने झाली. पहिले अधिवेशन होते माळी समाजाचे तर दुसरे संभाजी ब्रिगेडचे. माळी समाजाच्या अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे 'म. फुल्यांचा वारसा' सांगितला गेला. तसाच संभाजी ब्रिगेडच्या या राष्ट्रीय महाअधिवेशनात 'फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा' सांगितला गेला.
पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याची मागणी केल्यानंतर राजकारण आडवे आले, अशी खंत माळी समाजाच्या अधिवेशनात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याबद्दल भुजबळ जी आच बाळगतात तेवढीच आच ते महात्मा फुल्यांना जिव्हाळा असलेल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या प्रश्नांविषयी बाळगतात का? महात्मा फुल्यांच्या विचारसरणीला अनुसरून शैक्षणिक प्रश्नांवर त्यांनी कुठल्या भूमिका घेतल्या आहेत? पुणे विद्यापीठात ज्या महात्मा फुल्यांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी जोर लावला त्या फुल्यांना बहुजनसमाजाच्या शिक्षणाची आच होती. त्या समाजाच्या शिक्षणाशी निगडित आज अनेक प्रश्न विद्यापीठात आणि बाहेरही आहेत. त्यासाठी फुल्यांचा वारसा सांगणारे लोकप्रतिनिधी काय करीत आहेत, असे विचारावेसे वाटते.
पुणे विद्यापीठाच्या अवाढव्य वाढलेल्या आकारामुळे कार्यक्षम कारभार होत नाही. परीक्षाव्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. विद्यापीठाचे विभाजन करण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र समतेचा जयघोष करणाऱ्या, एकाही लोकप्रतिनिधीने यासाठी पुरेशा ताकदीने मागणी केलेली नाही. ज्या नाशिक जिल्ह्याचे पालकत्व भुजबळांकडे आहे तिथे पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी जागेची आवश्यकता आहे. अशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले आहेत? पालकमंत्री या नात्याने भुजबळांची याबाबतची भूमिका महत्त्वाची आहे कारण हे उपकेंद्र एका सार्वजनिक विद्यापीठाचे आहे.
महात्मा फुले यांनी त्या काळात ब्रिटिश सरकारकडे मोफत सरकारी शिक्षणाचा आग्रह धरला होता, खासगी शिक्षणाचा नव्हे. जोतिबा आज हयात असते तर त्यांनी शिक्षणसम्राटांकडून होत असलेल्या नफेखोरीवर कडाडून असूड ओढला असता. नाशिक शहरात सरकारी जागांवर अनेक खासगी शिक्षण संस्थांच्या मॉलसदृश इमारती उभ्या आहेत. मात्र सार्वजनिक विद्यापीठाच्या उपकेंद्रांसाठी जागा मिळू नये? याची जबाबदारी समतेचा उद्घोष करणाऱ्या लोकप्रतिनिधींची नाही का ?
फुले, शाहू, आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण बहुजन समाजापर्यन्त पोहोचले. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षांमधे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे हे शिक्षण सर्वसामान्य जनांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भरमसाठ डोनेशन व फिया भरल्याशिवाय आज केजी ते पीजीपर्यंतच्या कुठल्याच खासगी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही,  ही वस्तुस्थिती आहे. प्रचंड फिया व देणग्या वसूल केल्यानंतरही शिक्षणसम्राटांची भूक भागत नाही व शासनातर्फे समाजातील काही घटकांना, काही प्रमाणात दिली जाणारी शिष्यवृत्तीसुद्धा हे बकासूर शिक्षणसम्राट घशात घालतात. मात्र पालक व विद्यार्थी जर या अन्यायाच्या विरोधात उभे राहिले तर शासन अन्यायाकडे दुर्लक्ष करून शिक्षणसम्राटांचीच तळी उचलतात. 'शिक्षणसंस्था खासगी असल्यामुळे शासन काही करू शकत नाही' अशी भूमिका नोकरशहा व राज्यकत्रे सोइस्करपणे घेताना दिसतात. (उसाला रास्त भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांनाही लोकशाहीतील हे शासन असेच उत्तर देत आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी हा एकच समान धागा जाणणाऱ्या, एकदिलाने संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांत जातीच्या नावाने फूट पाडण्याचा प्रयत्न फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा सांगणारे जाणते राजकारणी करतात.)
शिक्षणव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसांचे शोषण आज होत आहे ते शिक्षणसम्राटांमुळे. आणि हेच शिक्षणसम्राट परवाच्या माळी समाजाच्या व नंतरच्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनांच्या व्यासपीठांवर सन्मानाने मिरवत होते.
संभाजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ओबीसींच्या अस्मितेच्या राजकारणावर टीका केली गेली. पण अस्मितेच्या राजकारणाची अशीच टीका संभाजी ब्रिगेडला लागू होत नाही का? एकीकडे ओबीसींच्या (म्हणजेच येथे, माळी समाजाच्या) अस्मितेचा झेंडा तर दुसरीकडे बहुजन (म्हणजेच येथे, मराठा समाजाच्या) अस्मितेचा झेंडा. यासारख्या कोत्या अस्मेतेचे राजकारण फुले, शाहू, आंबेडकर यांपैकी कुणालाही मान्य नव्हते. या तिघांनीही शिक्षणाच्या मूळ प्रश्नाला हात घातला होता आणि शिक्षण सर्वाना मिळाले पाहिजे यासाठी संघर्ष केला होता. हा संघर्ष तत्कालीन व्यवस्था व प्रस्थापित यांच्या विरोधात होता आणि तो त्यांनी नेटाने केला होता.मात्र आज हे झेंडे मिरवणारे असा कुठला संघर्ष सर्वसामान्य जनांना शिक्षण मिळावे यासाठी शासन व शिक्षणसम्राट  यांच्या विरोधात करताना दिसत आहेत ?
'पहिली ते बारावीपर्यन्तचे शिक्षण मोफत करा' हा ठराव संभाजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात करण्यात आला, याचे स्वागत करायला हवे. मात्र येणाऱ्या काळात या  ठरावाचा पाठपुरावा किती सातत्याने व नेटाने संभाजी ब्रिगेड करेल हे बघावे लागेल. वास्तविक पाहाता केजी ते पीजी शिक्षण मोफत करावे अशी मागणी अनेक ठिकाणांहून होत असताना संभाजी ब्रिगेडने मागणीचा असा संकोच का करावा ? केवळ बारावीपर्यन्तचे शिक्षण घेऊन आज कुठलाही विद्यार्थी सक्षमपणे आपल्या पायावर उभा राहू शकत नाही. बहुजन समाजातील गरीब विद्यार्थी आज पैशांच्या अभावी उच्च शिक्षणापासून वंचित आहेत. केवळ आरक्षणाची व्याप्ती वाढवून हा प्रश्न सुटेल का?
दोन वर्षांपूर्वी नाशकात झालेल्या अखिल ब्राम्हण समाजाच्या अधिवेशनातही जातीने ब्राम्हण असलेले शिक्षणसम्राट व्यासपीठावर विराजमान होते. शिक्षणसम्राट माळी समाजाचा असो की मराठा समाजाचा अथवा ब्राम्हण समाजाचा, त्यांच्या नफेखोरी प्रवृत्तीची जातकुळी एकच असते. नफेखोरीच्या विरोधात एकही ठराव या कुठल्याच अधिवेशनामधे संमत झाला नाही. खरे  म्हणजे शिक्षण महाग होण्याला शासनाची जबाबदारी झटकण्याची भूमिका आणि शिक्षणसम्राटांची निर्लज्जपणे नफेखोरी करण्याची प्रवृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू कारणीभूत आहेत. शिक्षणसम्राटांच्या नेतृत्वाखालील कुठलीही चळवळ शिक्षणाच्या नफेखोरीविरोधात भूमिका घेऊच शकत नाही. कारण लोकांच्या शोषणावरच तर त्यांचे साम्राज्य उभे असते!
जातीपातींच्या अस्मितांवर आधारित समाजकारण व राजकारण यांना छेद देण्याचा प्रयत्न गेल्या २० वर्षांत शिवसेनेने जरूर केला. मात्र शिवसेनेचे राजकारणही नेहमीच अस्मितेवर आधारित राहिलेले आहे - कधी मराठीपणाची भाषिक अस्मिता तर कधी हिंदुत्वाची धार्मिक अस्मिता. त्यामुळे शिवसेनेनेही शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील प्रश्नाखडे कधी लक्षच दिले नाही. गेल्या २० वर्षांत सामान्य माणसांचे शोषण करणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या विरोधात शिवसेनेने कुठलेही मोठे आंदोलन केलेले नाही.
थोडक्यात, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा वारसा पुरोगामी महाराष्ट्रात कोत्या अस्मितांच्या राजकारणात व समाजकारणात गुदमरून गेला आहे. याचा परिणाम म्हणून, आजचे शैक्षणिक प्रश्न बाजूलाच राहात आहेत.