Wednesday 14 September 2011

कन्यांच्याहस्ते कामांचे उदघाटन सोहळे !
आमदाराचा स्थानिक निधी असो अथवा खासदाराचा. या निधीतून घेतलेल्या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनाच बोलावले जावे असा आपल्याकडे अलिखित नियम आहे. त्यांनाही आपण काम करत असल्याची टिमकी यानिमित्ताने वाजवता येते. वास्तविक ही मंडळी मात्र  त्यांच्या घरच्या पैशातून काम करत असल्याचा आव आणताना दिसतात. तसे वावरताना दिसतात. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करायचा असतो,  यात त्यांचे ते काय कर्तृत्व ? पण या लोक[प्रतिनिधींचा तोरा मात्र भलताच असतो. आपल्याशिवाय कामाचे उदघाटन झाले नाही पाहिजे, असा त्यांचा हट्टाहास असतो. त्यामुळे सरकारी अधिकार्‍यांना- कर्मचार्‍यांना त्यांचा हा हट्ट पुरवावा लागतो तर  त्यांची मिजास सहन करावी लागते. पण आता निदान मध्यप्रदेशात तरी या प्रथेला फाटा मिळणार आहे. मुख्यमंत्री शिवराज्सिंह चौहान यांनी अशा कामांचे उदघाटन मुलींच्याहस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवराजसिंह आपल्या प्रदेशात 'मामा' म्हणून ओळखले जातात. त्यांनी ही संधी आपल्या 'भाची' कंपनींना मिळवून दिली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.  कामाच्या उदघाटन अथवा भूमिपूजनच्या शिलालेखावर उपस्थित असणार्‍या सर्व मुलींची नावे झळकणार आहेत. विविध योजनांच्या निर्माण कार्यात लोकांचा सहभाग वाढावा, काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, याबरोबरच मुलींचा यथोचित सन्मान केला जावा, हा यामागचा उद्देश आहे. अशा कार्यक्रमासाठी कमीत कमी आकरा तर जास्तीत जास्त २१ मुलींना  एकत्रित करून उदघाटन सोहळे पार पाडले जाणार आहेत.  शिवाय यावेळी सर्व मुलींना नवीन कपडे आणि मिठाई वाटली जाणार आहे. अर्थात स्थानिक लोकप्रतिनिधींना काहीच काम उरणार नसल्याने त्यांच्यात नाराजी उमटणार हे साहजिकच आहे, पण 'मामा'ने आपल्या 'भाचीं'साठी ही रिस्क घेतली आहे. अशी रिस्क महाराष्ट्रातले 'बाबा' - 'दादा' घेतील काय?                          - मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

No comments:

Post a Comment