Monday 14 May 2012

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची संख्या घटली; इंग्रजीची वाढली

जत,( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या  इंग्रजी भाषेला महत्त्व देण्याच्या नीतीमुळे मराठीकडे आकृष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे तर इंग्रजी माध्यमाच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच वर्षात मराठी क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या संख्येत चिंता करावी अशी घट झाली असून   मराठी पाठ्यपुस्तकांची संख्या तब्बल एक कोटीने घटल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र ऐनापुरे यांनी दिली.
पहिलीपासून इंग्रजी, पाचवीपासून सेमी इंग्रजी याला देण्यात आलेले प्राधान्य आणि पालकांची तीव्र इच्छा यामुळे मराठी माध्यमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशनाच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकल्यास या गंभीर प्रश्नावर प्रकाश पडतो. या मंडळाच्यावतीने ( बालभारती) दरवर्षी इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. त्यांच्या आकडेवारीनुसार २००९-१० मध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या मराठी माध्यमाची ९ कोटी ८ लाख पाठ्यपुस्तके छापण्यात आली होती. तर २०१०-११ मध्ये त्यात घट होऊन ८ कोटी १६ लाख इतकीच पाठ्य पुस्तके छापण्यात आली. २०११-१२ मध्येही यात आणखी घट आली आहे.
२००९-१० व २०१०-११ या कालावधीत जवळपास ९२ लाख म्हणजे १ कोटी मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये घट झाली आहे. तर इकडे इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईत वाढ झाली आहे. २००९-१० मध्ये २ कोटी २१ लाख इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके छापण्यात आली होती तर २०१०-११ मध्ये २ कोटी ४६ लाख इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तकाची प्रकाशित करण्यात आली. म्हणजे यात जवळ जवळ २५ लाख इंग्रजी पुस्तकांची वाढ झाली आहे, असे श्री. ऐनापुरे म्हणाले.
इंग्रजी शाळांकडे वाढलेला ओढा याला सरकारी शाळा अथवा शिक्षक कारणीभूत नाहीत. महाराष्ट्र शासनाने इंग्रजी शिक्षणाला दिलेले प्राधान्य आणि पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढलेला कल  यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. श्री. ऐनापुरे पुढे म्हणाले, आज प्रत्येक पालक आपले मूल पुढे इंजिनिअर, डॉक्टर अथवा अन्य उच्च डिग्रीचे शिक्षण घ्यावे, अशी मनीषा  बाळगून आहे. सध्या इंग्रजीची क्रेज आहे. इंग्रजीला जॉबची भाषा समजली जाते. यशस्वीरित्या व्यवसाय सांभाळण्यासठी इंग्रजी येणं आवश्यक असल्याचे मानले जाते. त्यामुळे आज पालकांचा  आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत पाठवणं स्वाभाविक आहे.    अर्थात हा कल स्वाभाविक असला तरी मराठीसाठी मात्र  धोक्याची घंटा आहे, असे म्हणायला हवे. पुढे असेच चालू राहिले तर मराठी महाराष्ट्रातच हद्दपार होण्याची भीती आहे.
श्री. ऐनापुरे म्हणाले, आजच्या वैश्विकिकरणात कुणीच मागे राहायला तयार नाही. त्यामुळे प्रत्येकजण इंग्रजी शिकू इच्छित आहे. आपल्या पाल्यालाही पालक इंग्रजीचेच धडे द्यायला तयार झाला आहे, त्यामुळे मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकाच्या संख्येत घट येत आहे. महाराष्ट्र शासनानेही दहा- बारा वर्षांपूर्वी पहिलीपासून इंग्रजी विषयांचा समावेश केला. गेल्या काही वर्षांपासून पाचवी इयत्तेपासून सेमी इंग्लीश सिलॅबस सुरू केला. तर आता काही ठिकाणी पहिलीपासूनच सेमी इंग्लीश सिलॅबस सुरू केला जात आहे. त्यामुळे साहजिकच इंग्रजीकडे ओढा वाढला आहे. मात्र मराठीसाठी ही गोष्ट चिंता करायला लावणारी आहे, हे निश्चित!

1 comment:

  1. महाराष्ट्राची १७ व्या क्रमांकावर झेप

    इंग्रजी माध्यमाच्या शाळा ०.०१ % पेक्षा कमीअसताना महाराष्ट्र शालेय आणि उच्च शिक्षणात १ ल्या क्रमांकावर होता. आता ९९ % सक्षम पालकांनी आपली सर्व मुले इंग्रजी माध्यमात घातली आणि आता महाराष्ट्राने १७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आपली घसरण करून घेण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे हे फलित आहे. आता आपल्याला पुन्हा १ल क्रमांक गाठायचा असेल, तर पुढील नियोजनासाठी सोबत जोडलेले दोन लेख वाचा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. - मराठीकाका, अनिल गोरे.

    ReplyDelete