Monday 6 August 2012

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे दोष

सीसीई ... सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यांकनाचा धडा राज्यभरातील शाळांमध्ये गिरविण्याचा निर्णय गेल्या शैक्षणिक वर्षापासून घेण्यात आला . शिक्षणव्यवस्थेत क्रांती घडविणारा निर्णय , अशा शब्दांत त्याचे गुणगानही गायले गेले . मात्र , त्यानंतर पहिले पाढे पंचावन्न . एकाच वर्षात या शिक्षणक्रांतीचा आपण पराभव केला . वास्तविक , गरज होती ती ' सीसीई ' मधील गुणदोष हेरण्याची ...

तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात मोठ्या विवंचनेत होते . पुण्याच्या बालभारतीमध्ये त्यांनी दिवसभर तळ ठोकून शिक्षणतज्ज्ञांच्या बैठकांमागून बैठका घेतल्या . विषयच तेवढा गंभीर होता . विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा ! परीक्षा हेच शैक्षणिक दबावाचे मूळ असल्याचा निष्कर्ष त्या ' वन डे ' बैठकांमधून काढण्यात आले . झाले ...

परीक्षांविषयक दबाव टाळण्यासाठीचे जीआर , म्हणजेच शासननिर्णय आणि परिपत्रकांचे वारू चौखुर उधळले . एका रात्रीत आपण शिक्षणव्यवस्थेमध्ये क्रांती घडवली . मग प्रश्न निर्माण झाला मूल्यमापन करायचे तरी कसे असा . त्यावर शिक्षणतज्ज्ञांचे हवाले देत सरकारने तोडगा शोधला . सीसीई ... सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन . पुन्हा जीआर वगैरेच्या दवंड्या पिटण्यात आल्या . आता राज्यभरातील शिक्षणविश्वात परवलीचा शब्द बनला तो सीसीई !

तोपर्यंत राजेंद्र दर्डांकडे शालेय खात्याचा वर्ग देण्यात आला होता . मूल्यांकनप्रक्रियेत क्रांती घडवितानाच आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापासच करायचे नाही , असे ठरविण्यात आले . मग हे मूल्यांकन कसे करायचे , याविषयीच्या मार्गदर्शक हस्तपुस्तिका वगैरे निघाल्या . आठकलमी कार्यक्रम देण्यात आला . आकारिक मूल्यमापन , सोप्या भाषेत सांगायचे तर ' फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ' पद्धतीचा स्वीकार करण्याचे आदेश देण्यात आले . त्यासाठी मूल्यमापनाची आठ साधने सांगण्यात आली . विद्यार्थ्याचे शाळेतील दैनंदिन व्यवहारादरम्यान निरीक्षण करायचे , ओरल्स , अॅक्टिव्हिटी , प्रोजेक्ट , प्रॅक्टिकल्स अशा अनेकविध माध्यमांतून विद्यार्थ्याला संकल्पना समजली आहे की नाही , हे जाणून घ्यायचे . प्रसंगी , सरप्राइज टेस्ट , शॉर्ट इन्फॉर्मल टेस्ट , ओपन बुक टेस्ट यांच्यासारख्या छोट्या चाचण्यांचा आधार घ्यायचा आणि क्लासवर्कच्या माध्यमातून त्याची प्रगती जोखायची . हे सर्व प्रकारचे मूल्यमापन करताना ' सर्वंकष सातत्यपूर्ण ' हा पायाभूत विचार राबवायचा .

आकारिक पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला किती ज्ञान मिळाले आहे , हे जाणून घेण्यासाठी चाचण्यांची परवानगी देण्यात आली ती समेटिव्ह इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून मात्र , घटकचाचण्यांची विद्यार्थ्यांवर दबाव टाकणारी पद्धत बंद करून पहिल्या आणि दुसऱ्या सत्राच्या अखेरीस एकेक , अशा फक्त दोनच चाचण्या घेण्याचे ठरविण्यात आले . त्यासाठीही , १०० - १०० मार्कांचे पेपर नि तीन - तीन तास रखडपट्टीची वर्गांमध्ये हकालपट्टी करण्यात आली . त्याऐवजी पहिली ते आठवीांसाठी १० मार्कांची ओरल घेण्याचे आदेश देण्यात आले . त्याच्याच जोडीला पहिली - दुसरीसाठी २० मार्कांची लेखी , तिसरी - चौथीसाठी ३० मार्कांची , पाचवी - सहावीसाठी ४० मार्कांची नि सातवी - आठवीसाठी ५० मार्कांची लेखी परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली .

शिक्षणात क्रांती झाली . परीक्षेच्या जोखडामध्ये अडकलेल्या शिक्षणव्यवस्थेने मोकळा श्वास घेतला , परीक्षार्थी विद्यार्थी आता ज्ञानार्थी होणार ... वगैरे वगैरे . ' सीसीई ' राज्यभर गुणगान करण्यात आले .

' सीसीई ' च्या गुणदोषांवर चर्चा हवी

परीक्षार्थींना ज्ञानार्थी बनविण्यासाठी ही मूल्यमापन प्रक्रिया उपयुक्त आहे , असे शिक्षणतज्ज्ञांची सांगितले . त्यानुसार आपण अंमलबजावणी सुरू केली . खरं तर यंदाच्या वर्षी शिक्षक - विद्यार्थी , पालकांपासून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून या प्रक्रियेतील गुणदोष हेरण्यासाठी राज्यव्यापी संवादसत्रे घेण्याची . ' सीसीई ' शिक्षणव्यवस्थेमध्ये स्थान पक्के करून देण्याची संधी देताच आपण पुन्हा परीक्षांच्या मागे लागलो आहोत . पुण्यासह राज्यातील कित्येक शाळांमधून आता घटकचाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत . अगदी , वर्ग बदलून बैठकव्यवस्था आखून पूर्वीच्या परीक्षांप्रमाणेच विद्यार्थ्यांना मान खाली घालून परीक्षार्थी होण्याचा तंबी देण्यात आली .

मूल्यांकनाची प्रक्रिया बदलण्याबरोबरच परीक्षेतील पास - नापासची संकल्पना रद्द करण्याचा घाटही आपण एकाच वेळी घातला . त्याचा विपरित परिणाम झाला . ' सीसीई ' बाबत गेल्या वर्षभरात पालकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली . विद्यार्थ्यांचे शिक्षणावरील लक्ष उडून गेले आहे . शाळा - शिक्षण याविषयी काहीच गांभीर्य राहिलेले नाही . परीक्षाच नाही , पास - नापासच नाही म्हणजे काय , रोजच ऑफ पिरीएड , अशा शब्दांमध्ये ' सीसीई ' चे स्वागत करण्यात आले . पहिल्याच अनुभवातून आलेल्या या प्रतिक्रिया होत्या . त्यांचा विचार करून यंदाच्या वर्षीसाठी ' सीसीई ' चे सुधारित मॉडेल विकसित करण्याची तसदी घेण्याची गरज होती ; परंतु आपल्याकडील शिक्षणव्यवस्थेमध्ये अशा लवचिकतेला स्थानच नाही .

धोका ... अविश्वास वाढण्याचा

शाळांमधून ' सीसीई ' वर लाल फुली मारण्याच्या या ट्रेंडमधील आणखी एक धोकादायक बाब म्हणजे शिक्षणव्यवस्थेवरील दृढ होणारा अविश्वास . आणि ही भावना पसरविण्यात आघाडीवर आहेत ते शहरांमधील विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू , मध्यमवर्गातील पालक . या शाळा नि पालकांना सर्वच गोष्टींची घाई असते . हव्या त्या साधनसुविधा त्यांना उपलब्ध असतात . एखाद्या आदेशाचा अर्थ समजून अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण दुर्गम भागातील शाळांना सहा महिन्यांचा कालावधी लागेल ; पण शहरांमधील पालक नुसते वेड्यासारखे मुला - मुलीचा प्रोजेक्ट करण्यामागे धावत होते .

शाळांमधूनही या बदलच्या संकल्पनांचा अर्थ समजून देण्याचा फारसा प्रयत्न केला गेला नाही . एक परीक्षा घेऊन मूल्यमापन करून टाकायचे , ही सर्वांत सोप्पी पद्धत . कुठे कोण कशाला सीसीई , आकारिक वगैरेच्या भानगडीत पडेल , असा शिक्षकांचाही दृष्टिकोन .

शिक्षकांचाही दोष नाही . त्यांना आपण नवीन प्रक्रियेमध्ये स्थिरस्थावर होण्यास वेळ देतोच कुठे . लगेच , नवीन प्रक्रियेला यश मिळवून देण्याची शिक्षकांकडून अपेक्षा . परिणामी , पुन्हा गोंधळ - संभ्रम आणि पालकवर्गाचा शिक्षणव्यवस्थेवर अविश्वास .

प्रयोग रुजणार तरी कसे ?

रसायनांचे इंजेक्शन देऊन आंब्याला लवकर पिकवले जाते . विद्यार्थ्यांना असे कोणते इंजेक्शन देणार ? कोणताही शिक्षणप्रयोग दीर्घकाळ राबविण्याची संयमित शैक्षणिक मानसिकता समाजाच्या या तथाकथित बुद्धिजीवी वर्गात नाही . त्यांना हवाय रिझल्ट , तोही इंस्टंट !

' सीसीई ' ला ऑप्शनला टाकून शाळांमध्ये पुन्हा परीक्षासत्र सुरू झाले आहे . मोकळ्या वातावरणातील विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षांचा ताण टाकला जाऊ लागेल . पुन्हा आत्महत्यांचे सत्र सुरू होईल . नि पुन्हा कोणत्या तरी नवीन पॅटर्नची घोषणा होईल !

No comments:

Post a Comment