Monday 12 September 2011

मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावीच्या गणित आणि विज्ञान या विषयांच्या लेखी परीक्षेत आता किमान २५ टक्के गुण मिळविणे बंधनकारक केले आहे. या मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव व्ही. बी. पायमल यांनी  दिली.
परीक्षा मंडळाने गतवर्षीच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये काही मूलभूत बदल केले आहेत. हे बदल प्रामुख्याने गणित व विज्ञान या दोन विषयांच्या संदर्भात असल्याचे पायमल यांनी सांगितले. यापूर्वी गणित व विज्ञान या विषयांना अंतर्गत मूल्यमापन व लेखी परीक्षेला मिळून ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक होते. सुधारित बदलानुसार या दोन्ही विषयांतील लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना किमान २५ टक्के गुण मिळविणे बंधनकारक आहे. यापुढे लेखी परीक्षेत किमान २५ टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांनाच अंतर्गत गुण दिले जाणार आहेत.
अंतर्गत गुणांसह उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणांची अट कायम आहे. गणित व विज्ञान या दोन महत्त्वपूर्ण विषयांत विद्यार्थ्यांची सचोटी लागावी, या हेतूने हा बदल करण्यात आला आहे. या सुधारित मूल्यमापन पद्धतीमध्ये भाषांची मूल्यमापन पद्धती मात्र पूर्वीप्रमाणेच कायम ठेवली आहे.
अंतर्गत मूल्यमापन पद्धत सुरू झाल्यापासून दहावीच्या निकालामध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. अंतर्गत मूल्यमापनामुळे लेखी परीक्षेचे महत्त्व कमी झाले होते. त्यामुळे परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

No comments:

Post a Comment