Wednesday 15 August 2012

स्वागत ‘ओपन बुक’ परीक्षापद्धतीचे

केंद्रीय माध्यमिक परीक्षामंडळ (सीबीएससी) ओपन बुकपरीक्षापद्धत सुरू करण्याचा विचार करत आहे, ही गोष्ट खूपच स्वागतार्ह आहे. मी काही वर्षापूर्वी आयएमबीआर या संस्थेत असताना अशा प्रकारची परीक्षा घेण्याचा प्रयोग एक वर्ष केला होता. परंतु सभोवतालचे वातावरण परंपराप्रिय असल्यामुळे, असे काही करू नका, आपली पूर्वीचीच परीक्षापद्धती सुरू ठेवा असा आग्रह धरण्यात आल्यामुळे पुढे ही पद्धत बंद पडली. खरं तर फार पूर्वीपासूनच मी ओपन बुक परीक्षापद्धतीच्या बाजूने समर्थन करत आहे. कारण आपल्याकडची सध्याची प्रचलित परीक्षापद्धत ही ब्रिटिशांनी आणली आहे. या परीक्षापद्धतीमध्ये मुलं केवळ प्रश्नांची उत्तरं घोकमपट्टी करून पाठ करतात. परीक्षेच्या वेळी स्मरणशक्तीला ताण देऊन त्यांची उत्तरे लिहितात. परीक्षांचा हा ताण मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे मुले अभ्यासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागतात. एक प्रकारे आपण मुलांवर हा अन्यायच करत आहोत. ही परंपराप्रिय परीक्षापद्धती खरं तर खूप आधीपासूनच बंद करायला हवी होती. भारतातून ब्रिटिशांना जाऊन आता 65 वर्ष होत आहेत. पण, तरीही आपण त्याच जुनाट परीक्षापद्धतीला धरून आहोत. या परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती आहे का, ते तर्कसंगत विचार करू शकतात का, शिकलेल्या माहितीचा वापर करून इतर प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात का, इत्यादी गोष्टींची तपासणी होतच नाही. केवळ प्रश्नोत्तरे पाठ करून आणि स्मरणशक्तीला ताण देऊन मुलांची बुद्धिमत्ता तपासणे हे चुकीचेच आहे. हा ताण सहन न झाल्यामुळेच मुले आत्महत्या करतात.
ओपन बुक अर्थात पुस्तके उघडी ठेवून उत्तरे लिहिणे म्हणजे कॉपी करणे नाही. कारण कुठल्याही प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी संबंधित पाठाचे आकलन होणे गरजेचे असते. ते आकलन झाले असेल तरच विद्यार्थी त्या पाठातील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो आणि अशा प्रकारे उत्तर लिहायचे असेल तर विद्यार्थ्यांना पुस्तकातील पाठ वाचणे अत्यावश्यक बनेल. सध्याची परीक्षापद्धती बघता मुले पुस्तकं वाचतच नाहीत तर रेडिमेड उत्तरांचे गाईड वाचतात. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर, विचार करून स्वत:च्या भाषेत कसे लिहायचे हे मुलांना समजतच नाही आणि हा त्यांचा खूप मोठा तोटा आहे. ओपन बुक पद्धतीमुळे मुले पुस्तकं वाचू लागतील. त्यातील पाठ त्यांना स्वत:ला समजल्यानंतर त्यातील प्रश्नांची ते तर्कसंगत उत्तरे देऊ लागतील. थोडक्यात शैक्षणिक आणि बौद्धिक दर्जा सुधारेल हे नक्कीच.
सर्व ठिकाणाच्या परीक्षांमध्ये एकसूत्रता येण्यासाठी अथवा दर्जा सारखा असावा म्हणून सरकारने फक्त प्रश्नपत्रिका काढून द्याव्यात. सीबीएससी बोर्ड हे परीवर्तनवादी आहेत म्हणूनच त्यांनी गेल्या वर्षी शाळेने परीक्षा घेण्याचा पर्यायदेखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला होता. पण, राज्य माध्यमिक मंडळ अजूनही परंपरागत पद्धतीपासून दूर व्हायला तयार नाही. प्रश्नोत्तरे पाठ करून उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिणे म्हणजे पाटय़ा टाकण्याचेच काम झाले. त्यामुळे मुलांचा सर्वागिण बौद्धिक विकास होत नाही. म्हणूनच हा नवा बदल स्वीकारून आता इतर परीक्षामंडळांनीदेखील ओपन बुक पद्धती स्वीकारावी, असे मनापासून वाटते.
या परीक्षापद्धतीमुळे प्रश्न काढण्यातही वैविध्य येईल. कारण प्रश्न काढणे हेदेखील मोठे कौशल्य आहे. आताच्या परीक्षापद्धतीत बहुतेक शिक्षक मागच्या काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन तेच ते प्रश्न विचारत असतात. त्यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेरचा विचार करत नाहीत. ओपन बुक परीक्षापद्धती अस्तित्वात आली तर विद्यार्थी सखोलपणे अभ्यास करतील. त्यांच्या मनावरील पाठ केलेले उत्तर आठवून लिहिण्याचा ताण कमी होईल आणि ते मोठय़ा आवडीने पुस्तके वाचू लागतील. पुस्तके वाचल्यामुळे त्या त्या विषयातील बारीक-सारीक गोष्टींचेही त्यांना ज्ञान मिळेल. या मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून ते कुठल्याही प्रकारचा प्रश्न नक्कीच सोडवू शकतील. या पद्धतीमुळे गाईड किंवा तयार उत्तरे वाचण्याची सवय कमी होईल आणि मुले स्वत:च्या मनाने उत्तरे लिहू लागतील. पुस्तक उघडून उत्तर लिहिणे याचा अर्थ बघून लिहिणे असा होत नाही, हे सर्वप्रथम शिक्षकांनी आणि त्यांच्याबरोबर पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
कोणतीही नवीन संकल्पना राबवताना ती संबंधित घटकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवणे खूप आवश्यक असते. ती तशा प्रकारे पोहोचली नाही तर त्याला विरोध होण्याची दाट शक्यता असते. ठोकळेबाज प्रश्नांची ठोकळेबाज उत्तरे ओपन बुक परीक्षापद्धतीत अपेक्षित नसतात तर पाठ व्यवस्थित समजावून घेऊन त्यातला अन्वयार्थ काढून स्वत:च्या भाषेत उत्तर लिहिण्यासाठी पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर करणे अपेक्षित असते. ही परीक्षापद्धती राबवली तर स्वयंबुद्धीने विचार करणारी पिढी घडविण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. वर्षानुवर्षाच्या चालत आलेल्या परंपरा चटकन सोडायला आणि नव्या पद्धती स्वीकारायला कोणी तयार होत नाही. त्यासाठी संबंधित घटकांची मानसिकता तयार करावी लागते. त्यामुळे ओपन बुक ही परीक्षापद्धती सुरू करण्यापूर्वी संबंधित मंडळाला शिक्षकांची आणि पालकांची मानसिकता बदलावण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. या परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. त्यानंतरच हे घटक खुल्या दिलाने या परीक्षेचा स्वीकार करतील. अन्यथा विरोधामुळे पुन्हा ही पद्धती मागे पडेल. ओपन बुक परीक्षापद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे या पद्धतीमुळे कॉपी प्रकाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. कॉपी करणारा विद्यार्थी केवळ प्रश्नांची उत्तरं लिहून आणतो अथवा गाईडची पाने फाडून आणतो.
हळूहळू राज्य माध्यमिक मंडळदेखील परिवर्तनाचा विचार करू लागले आहे. एक तर्कसंगत विचार करणारी आणि स्वयंबुद्धीचा वापर करून उत्तीर्ण होणारी खऱ्या अर्थाने सखोल ज्ञान असणारी पिढी निर्माण करायची असेल तर ओपनबुक परीक्षापद्धती एक खूप चांगला पर्याय ठरू शकते हे नक्की.  - प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर  
( दै. प्रहार, मुंबईच्या सौजन्याने)

No comments:

Post a Comment