Sunday 11 September 2011

नगर - अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री कृष्ण तीरथ यांनी केली.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तीरथ यांची भेट घेतली. महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्या वतीने अनेक प्रश्‍नांवर एक तास चर्चा केली. वाढीव मानधनाचा फरक व त्याबाबतचा आदेश यांबाबत वाकचौरे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. वाढीव मानधनाची रक्कम राज्य सरकारकडे पाठविली असल्याचे मंत्र्यांनी निदर्शनास आणले. एप्रिलपासूनची फरकाची वाढीव रक्कम दिवाळीपर्यंत देण्याचे मंत्र्यांनी मान्य केले. अंगणवाडीमध्ये दिली जाणारी सुकडी, उपमा, शिरा आदी आहार वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्र्यांना दाखविला. हा आहार लाभार्थी मुले खात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. याबाबत चौकशी करून सरकार पूर्वीप्रमाणेच आहार देईल, असे आश्वासन श्रीमती तीरथ यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांमधून पदोन्नतीने पर्यवेक्षकांची पदे भरण्याचा आग्रह वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरला. अंगणवाडी सेविकांमधून ही पदे प्राधान्याने भरण्याचे त्यांनी मान्य केले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या विम्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे तीरथ यांनी सांगितले. सर्व मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर अंगणवाड्यांत करण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना नियमित अंगणवाड्यांप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या पाल्यांना नववीपासून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या जागा भरताना त्याच गावातील मदतनिसांचा प्राधान्याने विचार करण्याचे मंत्र्यांनी मान्य केले. सरकारच्या आदेशातील त्रुटी वाकचौरे यांनी निदर्शनास आणल्या. त्या दूर करण्याचे तीरथ यांनी मान्य केले.

No comments:

Post a Comment