‘आजचा दिनविशेष’ आणि ‘इन्किलाब झिंदाबाद’ ही दोन पुस्तके. एक राजहंस प्रकाशनचे, तर दुसरे कॉन्टिनेन्टलचे. आज दिनांक, शतकातील शुक्रतारे, घर त्यांचं, स्मरणयात्रा, दैनंदिन बोधकथा हे सदर लेखन. दिवाळी अंकातून तसेच आकाशवाणीसाठी लेखन. मंगेशकर कुटुंबीयांना सांगलीनगरीच्या वतीने दिलेल्या सुवर्णाकित मानपत्रांचे लेखन, विविध अंकांचे संपादकीय काम आणि स्वत:च्या अभ्यासासाठीचे सुमारे साडेचार हजार ग्रंथांचे स्वत:चे ग्रंथालय. छत्रपती शिवाजी महाराज ते संत तुकडोजी महाराज यांसह अनेक लेखक, कलावंत आणि क्रांतिकारकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह. नामवंत वक्ते, नेते, कलाकार आणि विचारवंतांच्या ध्वनिफितींचा संग्रह. मग यात स्वामी विवेकानंद ते संत गाडगेमहाराज.. सर्व आले. अनेक महनीय व्यक्तींच्या माहितीपटांचा खजिना. ज्ञानेश्वरपूर्वकालीन भूर्जपत्रे आणि ताडपत्रे, शिवकालीन नाणी, महाराष्ट्रातील गडकोटांच्या हजारो रंगपारदर्शिका, स्वत: टिपलेली हजारो छायाचित्रं, साहित्यिकांची शेकडो पत्रं.. ही यादी आणखी खूपच लांबवता येईलही. ही सगळी दौलत आहे एका प्राथमिक शिक्षकाची.. सदानंद कदम त्याचं नाव. कवठेमहांकाळ या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या आगळगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचं काम करणारा एक प्राथमिक शिक्षक. भोवतालच्या ग्रामीण भागातल्या मुलांना लॅपटॉपच्या साहाय्यानं नवं जग दाखविणारा शिक्षक.

‘ज्ञात इतिहासातील एखादी घटना उकरून काढून त्यावर समाजात वादविवाद रंगविण्यापेक्षा त्या मुलुखावेगळ्या राजांनी केलेलं काम त्यांना महत्त्वाचं वाटतं.
यांच्या विचाराचं सूत्र महत्त्वाचं वाटतं. त्यातून प्रेरणा घेऊन नवं कर्तृत्व घडवावं.. इतिहासाकडं पाहण्याची.. वस्तुनिष्ठपणे पाहण्याची एक नवी दृष्टी निर्माण करण्यासाठीच हा सारा खटाटोप,’ असं त्यांचं म्हणणं असतं. खरा इतिहास कळावा, यासाठी त्यांची सतत धडपड असते. बालपणापासूनची वाचनाची सवय इथं त्यांना उपयोगी पडते. ऐकलेली व्याख्यानं आठवतात. असं सारं करतानाच त्यांच्या आयुष्यात आली ती डोंगराएवढी माणसंही आठवतात. ती सतत त्यांच्यासोबत असतात. अगदी बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर, निनाद बेडेकर, डॉ. जयसिंगराव पवार.. किती नावं सांगावीत? या सर्वाच्या मार्गदर्शनामुळंच आपलं जीवन घडल्याचं ते वारंवार सांगतात. पुरंदरे आणि दांडेकरांनीच भटकण्याचं वेड लावलं. हातात कॅमेरा दिला, पण हा छंद घरच्यांना परवडणारा नव्हता. वडील म्हणाले, ‘तुझ्या शिक्षणाचं मी पाहीन. बाकी तुझं तू बघ.’ या छंदासाठी पैसे हवेतच. मग मार्ग शोधणं सुरू झालं. वर्षभर लेथ मशीनवर काम, कोंबडय़ा विकणं, शिलाईचे क्लासेस घेणं.. एक ना अनेक धंदे केले. ध्येय एकच. पैसे मिळवणं आणि ते आले की गडकिल्ल्यांवर भटकणं!
एके काळी या माणसाच्या हाती तहसीलदारपदाच्या नियुक्तीचा आदेश पडला होता. पण याला भुरळ पडली ती लहान मुलांत रमण्याची. शिक्षक राहून मी माझा आनंद मिळवू शकतो, हे त्यांना पक्कं माहीत होतं. आज सदानंद कदम लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थीना मराठी व इतिहासाचं मार्गदर्शन करतात.
इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ बखरी वाचायला पाहिजेत, हे त्यांना कळत गेलं. मग त्यांनी बखरी गोळा केल्या, वाचल्या. मग समजलं की, इथला इतिहास वेगळाच आहे. आपल्याला माहीत असलेल्या शिवाजीपेक्षा कागदपत्रांतून सामोरे येणारे शिवाजी महाराज वेगळेच आहेत, खूपच मोठे आहेत. ज्यांच्या कर्तृत्वाला त्या काळातही सीमांचं बंधन नव्हतं, असे आहेत.. मग फक्त बखरी वाचून काय उपयोग! मूळ पत्र वाचायला हवीत, मोडी यायला हवं. आज सदानंद कदम हे सारं करतात. त्यातूनच मग सामान्यांच्या प्रश्नांना वस्तुस्थितिदर्शक उत्तरं देण्याचा अधिकार प्राप्त झाला. इतरांना अपरिचित शिवाजी सांगणं सुरू झालं.
शिवाजी महाराज कोणत्याही धर्माचे शत्रू नव्हते. ते इतरांच्या धर्माचा आदर करणारे होते. शूरवीरांचा सन्मान करणारे होते. म्हणूनच अफझलखानच्या वधानंतर त्यांनी त्याची कबर उभारली. त्यावर दिवाबत्तीची सोय केली. आम्ही मात्र शालेय इतिहासातून खरे मूल्य शिकवायचे सोडून अफझलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला, याचं रसभरित वर्णन करीत बसतो. प्रतापगडावर हा प्रसंग कसा घडला, याचा एक आराखडा आहे. त्यात सैन्याची रचना कशी होती, भूगोलाचा कसा वापर केला गेला हे दिसतं. आमच्या भटकंतीत या आराखडय़ाचं छायाचित्र सदानंद कदमांनी घ्यायला लावलं. चित्र आणि प्रत्यक्ष किल्ल्यावरून दिसणारा प्रदेश समजावून दिला. इतिहास कसा अभ्यासावा आणि कसा शिकवावा याचा तो वस्तुपाठच होता. हे सारं अनुभवायचं असेल तर त्यांच्याबरोबर त्यांच्या भटक्या जमातीत सामील व्हायला हवं.
लोकांना इतिहासाचं वेड लावणारा हा शिक्षक आहे. दरवर्षी ते मोडी लिपीच्या प्रशिक्षणाचे मोफत वर्ग घेतात. त्यालाही आता १५ वर्षे झाली. आजपर्यंत हजारएक लोकांना त्यांनी मोडीचं वेड लावलंय. अगदी १२ वर्षांपासून ते ७८ वर्षांपर्यंतचे वेडे यात आहेत. सुंदर हस्ताक्षराची कला त्यांना अवगत आहे आणि ती कशी आत्मसात करावी हेसुद्धा ते शिकवितात.
लेखक कलावंतांची, त्यांच्या जन्मघरांची दुर्मिळ छायाचित्रं, दुर्मिळ ग्रंथ यांचाही संग्रह त्यांच्याकडे आहे. ईस्ट इंडिया कंपनीने तयार केलेला फक्त महसूल अधिकाऱ्यांसाठीचा १८५२ चा १४ भाषांतील शब्दकोश त्यांच्याकडे पाहायला मिळतो.
अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे आजीव सदस्य असलेल्या सदानंद कदमांना अनेक सन्मानही लाभले आहेत. पु. ल. देशपांडे गुणगौरव पुरस्कार, आचार्य अत्रे गुणगौरव पुरस्कार, चतुरंगचे विशेष सन्मान पदक, आयडियलचा राज्यस्तरीय सुवर्णमुद्रा पुरस्कार..
साध्या राहणीचा हा माणूस ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे सगळं भरभरून देत असतो. अजून त्यांना ‘मी’ची बाधा झालेली नाही हे विशेष. त्यांच्याकडं पाहताना बोरकरांच्या ओळी आठवतात- ‘‘जीवन त्यांना कळले हो, ‘मी’पण ज्यांचे सहजपणाने पक्व फळापरी गळले हो..’’
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, जगायचं कशासाठी आणि का, हे समजलेला हा एक इतिहासवेडा शिक्षक आहे.
नामदेव माळी (loksatta)
No comments:
Post a Comment